नवी दिल्ली- बहुप्रतीक्षित अशा अल्टिमेट खो खो लीग -2022 स्पर्धेला पुण्यात येत्या 14 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत असून सहा संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 4 सप्टेंबर रोजी खेळली जाणार आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथील संकुलात खेळल्या जाणार्या या स्पर्धेतील सहभागी सहा संघ पुढीलप्रमाणे आहेत, 1) चेन्नई क्विक गन्स (केएलओ स्पोर्ट्स), 2) गुजरात जायन्ट्स (अदानी स्पोर्ट्सलाईन), 3) मुंबई खिलाडीज (बादशाह आणि पुनीत बालन), 4) ओडिशा जगरनॉट्स (ओडिशा राज्य शासन), 5) राजस्थान वॉरिअर्स (कॅप्री ग्लोबल) आणि 6) तेगुलू योद्धाज (जीएमआर स्पोर्ट्स. ) ही स्पर्धा एकूण 21 दिवस रंगणार आहे.
डाबर इंडिया समूहाचे अध्यक्ष अमित बर्मन आणि भारतीय खो खो महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्या या स्पर्धेतून अस्सल भारतीय मातीतील खेळ असलेल्या खो खो च्या स्वरूपात सर्व प्रकारे क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
अल्टिमेट खो खो लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेन्झिंग नियोगी म्हणाले, की सर्व सहा संघांचे प्रायोजक आणि सोनी समूह यांनी आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांना धन्यवाद. खो खोला नव्या अवतारात भारतीय प्रेक्षकांसमोर सादर करून देशाचे मल्टीस्पोर्ट हे स्वरूप सिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
साखळी फेरीत दररोज दोन अशा 34 लढती होणार असून बाद फेरी प्ले ऑफ पद्धतीने रंगणार आहे. बाद फेरीत क्वालिफायर व एलिमिनेटर लढतींचा समावेश आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण रोज सायंकाळी सात वाजता सुरू होणार असून रात्री 10 पर्यंत चालणार आहे. खो खो या खेळाचे या नवे, सुधारित आणि आकर्षक स्वरूप प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी निश्चितच यशस्वी ठरेल, असा आमचा विश्वास आहे.
क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय आशा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या साहाय्याने अल्टिमेट खो खोचा थरार प्रेक्षकांच्या घरापर्यंत थेट पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. हिंदी (सोनी टेन 3), इंग्रजी (सोनी टेन 1), तमिख व तेलुगू (सोनी टेन 4) आणि सोनी लिव्ह या वाहिन्यांवरून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा