पुणे, 14 ऑगस्ट 2022: लक्षावधी भारतीय क्रीडा प्रेमींना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या अल्टीमेट खो खो लीग या स्पर्धेला आज अत्यंत दिमाखात आणि अत्यंत उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. मुंबई खिलाडीज विरुद्ध गुजरात जायंटस या सामन्यातुन खो खो च्या नव्या रूपाचे दर्शन सर्व प्रेक्षकांना घडले.
प्रेक्षकांचे प्रोत्साहन आणि ढोल ताशांचा गजर अशा रोमांचकारी वातावरनात या सामान्यच आनंद सर्वांनी लुटला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून ते 4 सप्टेंबर पर्यंत ही स्पर्धा रंगणार असून यामध्ये सहा फ्रॅंचायझीचे संघ विजेतेपदासाठी झुंजनार आहेत. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यावरून या स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहेत.
पारंपरिक ढोल ताशांच्या निनादात भारतातील या पहिल्या व्यावसायिक खो खो लीगचे उदघाटन अल्टीमेट खो खो स्पर्धेचे कार्यकारी प्रमुख तेंझिंग नियोगी, अखिल भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशू मित्तल आणि महासचिव एम एस त्यागी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी चेन्नई क्विक गन्स संघाचे प्रतिनिधी व मालक संजय झुपुडी आणि श्रीनाथ चित्तुरी, गुजरात जायंट्सचे सत्यम त्रिवेदी, ओडिशा जुगरनट्सचे लीलन साहू, मुंबई खिलाडीज जान्हवी धारिवाल-बालन व पुनीत बालन बादशहा, राजस्थान वारीयर्सचे जिगर शहा तेलगू योद्धाजचे जी एम रुचिर आदी मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यावेळी म्हणाले की, अगदी तळागाळातील हजारो कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनती मुळे खो खो या भारतीय खेळाला आजचा दिवस दिसतो आहे. आज भारतातल्या प्रत्येक गावात आणि शाळेत खो खो खेळला जातो. त्यामुळे भारतातल्या मातीतला हा खेळ असून तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे.इतकेच नव्हे तर आता आशिया खंडाबरोबरच युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अशा विविध खंडांमधील 36 देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने या खेळाला मान्यता दिली असून आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत खो खो चा समावेश असेल. या खेळाचा वर्ल्ड कपही लवकरच होणार आहे. हा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून या खेळाचा नियमांमध्ये आणि खेळाच्या मैदानामध्ये एकंदरीत खेळाच्या स्वरूपात आम्ही अनेक बदल केलेले आहे. तेंझिंग नियोगी यांना या सर्वाचे श्रेय त्यांना जाते. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये अलतिमेत खो खो चा उल्लेख केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाला ग्लॅमर मिळाले आहे.






