भुवनेश्वर, ६ जाने.: अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये आज झालेल्या ओडिशा जगरनॉट्सने चुरशीच्या सामन्यात गुजरात जायंट्सवर विजय मिळवत उपांत्य फेरीत पोहचणारा तिसरा संघ ठरला. हा सामना ओडिशा जगरनॉट्सने ३ गुणांनी जिंकला हा सामना कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर पार पडला. आजच्या सामन्यामध्ये सुयश गरगटेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आज झालेल्या पहिल्या व एकूण तेविसाव्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सने गुजरात जायंट्सचा ३०-२७ (मध्यंतर १९-१४) असा तीन गुणांनी पराभव केला. गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व ओडिशा जगरनॉट्सला आक्रमणासाठी आमंत्रित केले. सात मिनिटांच्या पहिल्या टर्नमध्ये ओडिशा जगरनॉट्सने पहील्यांदाच पॉवर प्लेने सुरवात केली. गुजरात जायंट्सच्या पहिल्या तुकडीतील सुयश गरगटेला रोहन शिंगाडेने सहज बाद केले, अभिजित पाटीलला सुध्दा रोहन शिंगाडेने आकाशीय सूर मारत बाद केले व फैजंखा पठाणला मनोज पाटीलने आकाशीय सूर मारत बाद केले मात्र त्याआधी फैजंखाने ड्रीम रन्सचा एक गुण मिळवला त्यावेळी घड्याळात ३.२० मि. झाली होती. दुसऱ्या तुकडीतील व्ही सुब्रमणिला दिपेश मोरेने सहज बाद केले, राम मोहनला सुशांत काळधोणेने आकाशीय सूर मारत बाद केले तर राजवर्धन पाटीलला मनोज कुमारने सहज बाद केले मात्र त्याआधी राजवर्धनने सुध्दा ड्रीम रन्सचा एक गुण मिळवून दिला व हि तुकडी ६.२७ मिनिटात बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील भरत कुमारला मनोज पाटीलने स्तंभात बाद केले त्यावेळी ओडिशाचा गुणफलक १४-२ असा होता.
दुसऱ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या पहिल्या तुकडीतील गौतम एम के ला सुयश गरगटेने सहज बाद केले, दिलीप खांडवीला बाद केल्याचे अपील केले मात्र दिलीपने डीएसआर घेतल्याने तो नाबाद ठरला. त्यानंतर दिलीप खांडवीने ४ ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले दिलीप खांडवी (२.३४ मि. संरक्षण) बाद झाला तो संकेत कदमच्या सहज स्पर्शाने तर विशालला (१.०४ मि. संरक्षण) पी नरसय्याने आकाशीय सूर मारत बाद केले व हि तुकडी ५.१३ मिनिटाने बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील अक्षय मासाळला शुभम थोरातने स्तंभात बाद केले व दहा सेकंद असताना मनोज कुमारला शुभम थोरातने अंगावर जात सहज स्पर्शाने बाद केले. मध्यंतराला ओडिशा जगरनॉट्सने गुजरात जायंट्सवर १९-१४ अशी ५ गुणांची आघाडी घेतली होती (ओडिशा जगरनॉट्स दिलेल्या तुकडीतील खेळाडू ऐन वेळी बदलल्याने गुजरातला दोन गुण बहाल केले गेले).
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये गुजरात जायंट्सच्या पहिल्या तुकडीतील शुभम थोरातला (२.१५ मि. संरक्षण) दीपक साहूने आकाशीय सूर मारत बाद केले व लगेचच दिपक माधवला दिपेश मोरेने सहज बाद केले. अक्षय भांगरेने मात्र जास्त पडझड न होऊ देता २ ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले व तो अविनाश देसाई कडून बाद झाला व ह्या तुकडीने ३.३९ मि. संरक्षण केले. दुसऱ्या तुकडीतील फैजंखा पठाणला मनोज पाटीलने सहज बाद केले. तर सुयश गरगटे शेवट पर्यंत नाबाद राहिला व त्याने ड्रीम रन्सचा एक गुण सुध्दा मिळवून दिला. एकाद तर वजीर दीपक साहूच्या समोर दोन वेळा हुलकावणी देत सुयश गरगटेने स्वत: नाबाद खेळी केली व प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली. २७-१७
रोहन शिगाडेच्या खेळीने ओडिशा जगरनॉट्स विजयी.
शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सने २७-१७ अशी १0 गुणांची आघाडी घेत मैदानात उतरली व त्यांची पहिल्या तुकडीतील दिपेश मोरेला भरत कुमारने आकाशीय सूर मारत बाद केले, पाठोपाठ बी. निखील सुध्दा बाद झाला व ओंकार सोनवणेने ड्रीम रन्सचा एक गुण मिळवून दिला व भरत कुमार कडून स्तंभात बाद केले व ह्या तुडीने ३.३५ मिनिटे संरक्षण केले. दुसऱ्या तुकडीतील मनोज पाटीलला फैजंखा पठाणने सहज बाद केले तर अविनाश देसाईला बाद केल्याचे अपील केले गेले तर त्याने डीएसआर घेत नाबाद झाला व त्याने त्यानंतर चांगले संरक्षण करत ओडिशाला चांगल्या स्थितीत आणून ठेवले व त्यानंतर रोहन शिगाडेने नाबाद राहत दोन ड्रीम रन्स मिळवून देत संघाला विजय मिळवून दिला. हा सामना ओडिशा जगरनॉट्सने ३०-२७ असा तीन गुणांनी जिंकला. या सामन्यात मनोज पाटीलला उत्कृष्ट आक्रमक, दिलीप खांडवीला उत्कृष्ट संरक्षक तर सुयश गरगटेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रविवारी पहिला सामना मुंबई खिलाडीस व राजस्थान वॉरियर्स यांच्यात तर दुसरा सामना ओडिशा जगरनॉट्स व तेलगूयोद्धास यांच्यात रंगेल. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी अल्टीमेट खो खो स्पर्धा सुरु केली असून हे सर्व अल्टीमेट खो-खो चे सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील. (Ultimate Kho-Kho Season 2. Odisha Juggernauts beat Gujarat Giants in a tight match)
महत्वाच्या बातम्या –
‘हे’ पाच खेळाडू आहेत गावसकरांचेही फेवरेट, पाकिस्तानी चाहत्याच्या प्रश्नावर दिग्गजाचे उत्तर
मागच्या वर्षाप्रमाणे 2024 ची सुरुवात कमिन्ससाठी ठरली खास, पाकिस्तानला ‘व्हाईट वॉश’