चेन्नई, ३ सप्टेंबर २०२४: चेन्नई लायन्सने इंडियनऑइल अल्टिमेट टेबल टेनिस २०२४ मध्ये मंगळवारी पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाचा १२-३ असा पराभव केला. यूटीटीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून चेन्नई लायन्स उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. मंगळवारी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर मिळवलेल्या विजयात अनुभवी खेळाडू शरथ कमल चमकला.
ऐतिहासिक विजयासह यजमान चेन्नई लायन्स ३७ गुणांसह लीग टेबलवर चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ॲथलीड गोवा चॅलेंजर्सचेही समान गुण आहेत, परंतु त्यांनी चेन्नई लायन्सपेक्षा एक अधिक सामना जिंकला आहे. ३ विजयासह ते पुढे आहेत. पुणेरी पलटण टेबल टेनिस ३१ गुणांसह सहाव्या स्थानावर कायम आहे.
निकालाचा अर्थ असा आहे की, जर जयपूर पॅट्रियट्सने बुधवारी अहमदाबाद एसजी पायपर्सविरुद्ध या मोसमातील अंतिम लीग टाय जिंकली, तर चेन्नई लायन्स उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. पण अहमदाबादचा संघ आठ किंवा त्याहून अधिक गुणांनी जिंकल्यास चेन्नई संघ बाद होऊ शकतो.
चेन्नई लायन्सने ब्लॉक्सच्या अगदी जवळच आक्रमक खेळ केला आणि एकही गेम न सोडता पहिले तीन सामने जिंकून ९-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. अनुभवी शरथने पहिल्या पुरुष एकेरीत १७ वर्षीय प्रतिभावान अंकुर भट्टाचार्जीचा ३-० ( ११-७, ११-६, ११-२) असा पराभव करून चेन्नई लायन्सला दमदार सुरुवात केली. शरथने संपूर्ण सामन्यात दबदबा राखला. त्याचे अनेक शॉट्स खेळण्यायोग्य नव्हते, ज्यामुळे तरुण अंकुर स्पष्टपणे या सामन्यात पिछाडीवर पडला.
पोयमंती बैस्याने पहिल्या महिला एकेरीत अहिका मुखर्जीचा ३-० ( ११-१०, ११-९, ११-१० ) असा पराभव करत दोन गोल्डन गुण मिळविले. हा सामना खूपच चुरशीचा होता, अहिकाने प्रत्येक गेममध्ये जोरदार लढत दिली होती. यामुळे चेन्नई लायन्सला ६-० अशी आघाडी मिळाली आणि घरच्या संघाने मिश्र दुहेरीचा सामना आणखी ३-० अशा फरकाने जिंकून आपला धडाका सुरू ठेवला. साकुरा मोरी आणि शरथ या जोडीने नतालिया बाजोर आणि अनिर्बन घोष यांचा ३-० असा पराभव केला.
ज्युल्स रोलँडने चेन्नई लायन्सची अपराजित मालिका कायम राखली, दुसऱ्या पुरुष एकेरीत जोआओ मॉन्टेरोचा २-१ असा पराभव केला.
चेन्नई लायन्सला बाद फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी आणखी दोन गेम जिंकणे आवश्यक असताना, नतालियाने या मोसमात साकुराची नाबाद मालिका २-१ अशी मोडून काढली.
स्कोअर
चेन्नई लायन्स वि. वि. पुणेरी पलटण टेबल टेनिस १२-३ :
अचंता शरथ कमल वि. वि. अंकुर भट्टाचार्जी 3-0 (11-7, 11-6, 11-2)
पोयमंती बैस्या वि. वि. अहिका मुखर्जी 3-0 (11-10, 11-9, 11-10)
साकुरा मोरी/शरथ कमल वि. वि. नतालिया बाजोर/अनिर्बन घोष 3-0 (11-3, 11-8, 11-8)
ज्युल्स रोलँड वि. वि. जोआओ मॉन्टेरो 2-1 (11-7, 2-11, 11-3)
साकुरा मोरीचा पराभूत वि. नतालिया बाजोर 1-2 (10-11, 11-8, 3-11).