मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमर गुलने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. आता त्याला प्रशिक्षण क्षेत्रात आपली कारकीर्द पुढे वाढवायची आहे. उमर गुल पाकिस्तानकडून 47 कसोटी, 130 वनडे आणि 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
टी-20 विश्वचषकचे 2009 मध्ये पाकिस्तानने विजेतेपद जिंकले, त्यात त्याने मोठी भूमिका बजावली होती. नॅशनल टी-20 कप ही त्याची शेवटची स्पर्धा असेल. ही स्पर्धा 30 सप्टेंबरपासून मुल्तान आणि रावळपिंडी येथे खेळला जाईल आणि 18 ऑक्टोबरला या स्पर्धेचा समारोप होईल. या स्पर्धेत उमर गुल बलुचिस्तान फर्स्ट इलेव्हनचा भाग असेल. तो संघात मार्गदर्शक तसेच खेळाडूची भूमिका साकारेल.
2003 पासून ते 2016 पर्यंत उमर गुलने पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी त्याने एकूण 400 हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफनंतर उमर गुल पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करत होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आयपीएलच्या पहिल्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता.
नुकतेच उमर गुलने क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, निवृत्तीनंतर प्रशिक्षक बनू इच्छित आहे. तो म्हणाला की, ” मी निश्चितपणे सांगू शकत नाही, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर मी कोचिंगमध्ये नशीब आजमावेन. मी लेव्हल वन आणि लेव्हल टूचा कोर्स केला आहे आणि लवकरच मी लेव्हल थ्रीचा कोर्स पूर्ण करेन. मला मिळालेल्या मासिक वेतनातून माझा मासिक खर्च भागवायचो, परंतु खरे सांगायचे झाले तर घरगुती क्रिकेटमधून मिळणारे उत्पन्न कुटुंबाचा खर्च भागत नाही.”