“पंचांच्या सुरक्षितेकरिता राज्याच्या होणाऱ्या नवीन घटनेत काही नियम करण्यात येणार आहेत.” असे उदगार महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे प्रमुख कार्यवाह आस्वाद पाटील यांनी ” राज्यस्तरीय पंच शिबिराच्या” समारोप प्रसंगी काढले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व उत्कर्ष क्रीडा संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सणस मैदानावरील सभागृहात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे वार्षिक पंच शिबीराचे २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. उत्कर्ष क्रीडा संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात २३ जिल्ह्यातील ८६ पंच उपस्थित होते.
या शिबिरात संदिग्धता असलेल्या काही नियमात महाराष्ट्रात तरी एकवाक्यता असावी म्हणून नियमांचा आधार घेऊन एकवाक्यता करण्यात आली. अखिल भारतीय कबड्डी महासंघाकडून पुढील सूचना मिळेपर्यंत सामानाधिकाऱ्याने या नियमांची अमंलबजावणी करावी.याचे परिपत्रक लवकरच संबंधित जिल्ह्यांना पाठविण्यात येईल.
अखिल भारतीयस्तरावर झालेल्या नियमातील बदल, सामने खेळविताना पंचाना येणाऱ्या अडचणी, नियमाबाबत येणाऱ्या शंका, सामन्यावर कशा पद्धतीने उभे रहावे, त्यांचा हालचाली कशा असाव्यात, शिट्टी कशी वाजली पाहिजे, योग्य सिग्नलिंग या बाबत प्रत्यक्ष दोन संघात सामना खेळवून व स्लाईड-शोच्या माध्यमातून त्यांना समजावून देण्यात आले. या बाबतचे मार्गदर्शन पंच मंडळाकडून मनोहर इंदुलकर,शशिकांत राऊत, अजित पाटील यांनी केले. अर्जुनवीर श्रीराम (राजू) भावसार हे “पंचांकडून खेळाडू व प्रशिक्षकांच्या अपेक्षा” या विषयावर बोलताना म्हणाले की, ” पंचांनी नि:पक्षपणे व नियमांच्या चाकोरीत राहून योग्य निर्णय देऊन आपले एक स्थान निर्माण केले पाहिजे.
डॉ. विश्वास खेर्डीकर यांनी खेळाडूं व पंच यासाठी संतुलित आहार व वाढत्या वयात त्याची आवश्यकता या बाबत मार्गदर्शन केले. दुखापती व प्रथमोपचार याबाबत डॉ. अजित मापारे यांनी मार्गदर्शन करताना पंचांनी विचारलेल्या शंकांना समाधानकारक उत्तरे दिली. शारिरीक तंदुरूस्ती करिता व आपल्या हालचाली करिता झुंबा नृत्य कसे आवश्यक आहे या बाबत योगेश यादव यांचे मार्गदर्शन पंचाना लाभले. आंतर राष्ट्रीय योगा खेळाडू नितीन पवळे यांनी योगाचे महत्व पंचाना उत्तमरीत्या पटवून दिले.
या पंच शिबीराचे उद्घाटन पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष योगेश गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व पुणे मनपाचे नगरसेवक बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष वासंती सातव- बोर्डे, शकुंतला खटावकर (अर्जुन पूरस्कार),सरकार्यवाह मधुकर नलावडे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पंच मंडळाचे अध्यक्ष मनोहर इंदुलकर, सचिव शशी राऊत, सदस्य अजित पाटील, दत्ताझिंजुर्डे, गजानन मोकल, नवनाथ लोखंडे आदी उपस्थित होते.
शिबीराच्या समारोप प्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, उपाध्यक्ष बाबुराव चांदेरे, वासंती बोर्डे, मधुकर नलावडे, अर्जुनवीर शांताराम जाधव, नगरसेवक स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, श्रीकांत जगताप, महेश लडकत, राजेंद्र (आबा) शिळीमकर,उत्कर्षक्रीडा संस्थेचे कार्याध्यक्ष नगरसेवक रघुनाथ गौडा, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सचिन भोसले,खजिनदार बापू पवार, विशाल म्हात्रे व संतोष सावंत व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शिबीरास उपस्थित राहिलेल्या पंचांची निवास व भोजन व्यवस्था अतिउत्तम होती. नियोजन देखील नीटनेटके व उत्तम होते.एका वेगळ्या प्रकारच्या शिबीर आयोजनाचा आदर्श या शिबाराने घालून दिला. याकरिता योगेश यादव, विशाल म्हात्रे व उत्कर्ष क्रीडा संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि खेळाडू यांनी अपार मेहनत घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
- टाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू
- आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लिओनचा पाकिस्तानला दणका क्रिकेटमध्ये भीमपराक्रम
- टेन्शनमध्ये असलेल्या रहाणेने विंडीज मालिकेसाठी केली ही खास गोष्ट