इंडियन प्रीमियर लीगमधील २०२१ (आयपीएल) ४९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्या दरम्यान खेळला गेला. केकेआरने या सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवत प्ले ऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. हैदराबाद संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी, या सामन्यातून हैदराबाद व भारतीय क्रिकेटसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली. हैदराबादने पदार्पणाची संधी दिलेल्या उमरान मलिक याने आपल्या वेगाने सर्वांना चकित करत वाहवा मिळवली.
मलिकला मिळाली पदार्पणाची संधी
सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज टी. नटराजन कोविडबाधित आढळल्यानंतर नेट बॉलर म्हणून संघासोबत असलेल्या उमरान मलिक याला अल्पकालीन बदली खेळाडू म्हणून हैदराबाद संघात स्थान दिले गेले. मलिक हा २१ वर्षीय वेगवान गोलंदाज असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू आणि काश्मीर संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आजवर केवळ एक लिस्ट ए व एक टी२० सामना खेळला आहे. भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने शोधलेला व आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केलेला तो चौथा खेळाडू ठरला.
पहिल्या षटकात केले प्रभावित
सनरायझर्स हैदराबाद संघाने या सामन्यात संदीप शर्माच्या ऐवजी मलिक याला पदार्पणाची संधी दिली. त्याने आपले पहिले षटक अत्यंत वेगवान टाकत प्रत्येक चेंडू १४० किमी प्रतितास इतक्या वेगाने टाकला. आपला तिसराच चेंडू १५०.६ अशा वेगाने टाकून त्याने आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने मोहम्मद सिराजला मागे सोडले. आयपीएल २०२१ मध्ये मलिकपेक्षा वेगवान चेंडू केवळ लॉकी फर्ग्युसन व एन्रिक नॉर्किए यांनी टाकले आहेत. मलिकचे पहिले षटक पाहून समालोचन करत असलेले गौतम गंभीर व आकाश चोप्रा हे अवाक् झाले.
हैदराबादचा पुन्हा पराभव
दुबई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. केकेआरच्या सर्व गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत हैदराबादचा डाव ११५ धावांवर रोखला. त्यानंतर, हैदराबादने काही झटपट बळी मिळवत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुबमन गिलने ५७ धावांची लाजवाब खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.