भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 6 डिसेंबर पासून आॅस्ट्रेलिया आणि भारत संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी आजपासून भारताचा आॅस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध चार दिवसीय सराव सामना सुरु झाला आहे.
या सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर आॅस्ट्रेलिया एकादश संघाने चार षटकात बिनबाद 24 धावा केल्या आहेत. तर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 358 धावा केल्या.
या सामन्याला कालपासून सुरुवात होणार होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला दिवस एकही चेंडू न टाकता वाया गेला. त्यामुळे या सामन्याला आज सुरुवात करण्यात आली.
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून पहिल्या डावात पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतके केली.
या सामन्यात पहिल्या सत्रात 19 वर्षीय प्रतिभाशाली शॉने 11 चौकार मारत 69 चेंडूत 66 धावांची शानदार खेळी केली होती. पण दुसऱ्या सत्रात मात्र आॅस्ट्रेलियाचा 19 वर्षीय अॅरॉन हार्डीने भारताचा कर्णधार विराट कोहलीची विकेट घेतल्याने चमकला.
हार्डीने पहिल्या डावातील 48 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत विराटची विकेट घेतली. विराटने 87 चेंडूत 64 धावांची खेळी करताना 7 चौकार आणि 1 षटकार मारला.
हार्डी हा बॉर्नमाउथ, इंग्लंडमध्ये जन्मला असला तरी त्याने त्याचे सर्व क्रिकेट पर्थमध्ये खेळले आहे. तसेच तो पश्चिम आॅस्ट्रेलियाचा प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहे. तसेच त्याने त्याच्या राज्याच्या 17 वर्षीय आणि 19 वर्षीय संघाचे नेतृत्व केले आहे.
तसेच 2018 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी त्याचा आॅस्ट्रेलियाच्या संघात बदली खेळाडू म्हणूनही समावेश झाला होता.
मात्र त्याचा अजूनही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण झालेले नाही. पण त्याने याआधीच आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट आणि जेम्स विन्स यांना बाद करत त्याच्यातील क्षमता दाखवून दिली होती.
या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलला मात्र 3 धावा करुन बाद स्वस्तात बाद झाला. पण अन्य भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. अन्य फलंदाजांपैकी पुजारा(54), रहाणे(56*), विहारी(53), रोहित शर्मा (40) आणि रिषभ पंत(11*) यांनी धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–४०८ दिवसानंतर युवराजने काढली क्रिकेटमधील पहिली धाव
–पृथ्वी शाॅचा धमाका सुरुच, आॅस्ट्रेलिया दौऱ्याची धमाकेदार सुरुवात
–हॉकी विश्वचषक २०१८: पाकिस्तानी क्रिडा पत्रकारांचा व्हिसा नामंजूर