क्रिकेट जगतात असे काही धुरंधर होऊन गेले आणि अजूनही आहेत, ज्यांनी आपल्या विस्फोटक फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडला आहे. त्या धुरंधरांमध्ये ‘युनिव्हर्स बॉस’ नावाने ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याच्या नावाचाही समावेश आहे. गेलने वयाची चाळिशी ओलांडली आहे. तो 44 व्या वयातही चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत आहे. सध्या गेल लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. अशातच डेहराडून येथे माध्यमांशी बोलताना आयपीएलमधील 175 धावांच्या सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडणाऱ्या फलंदाजाच्या नावाचा खुलासा केला आहे.
काय म्हणाला गेल?
शनिवारी (दि. 25 नोव्हेंबर) ‘युनिव्हर्स बॉस’ (Universe Boss) गेलला प्रश्न विचारला गेला की, हा विक्रम मोडू शकेल असा कोणता फलंदाज असेल? या प्रश्नाचे उत्तर देताना गेल म्हणाला, “कोणत्याही क्षणी कोणताही फलंदाज हा विक्रम नक्की मोडू शकेल. जर तुम्ही आताच्या युवा फलंदाजांचा खेळण्याचा अंदाज पाहिला, तर त्यात खूप बदल झाला आहे. खेळपट्ट्याही आधीपेक्षा फलंदाजीसाठी चांगल्या झाल्या आहेत. तसेच, अनेकदा बाऊंड्रीही छोटी असते.”
“माझ्या मते, एखादा फलंदाज 200 धावांच्या आसपासही पोहोचू शकतो. मात्र, मी त्या फलंदाजाचे नाव सांगू शकत नाही, पण हा विक्रम मोडणे पूर्णपणे शक्य आहे. तो कोणताही फलंदाज असू शकतो, ज्याला कोणत्या तरी दिवशी फलंदाजी करण्यासाठी चांगली खेळपट्टी मिळेल,” असेही गेल पुढे बोलताना म्हणाला.
आयपीएलची सर्वोच्च वैयक्तिक खेळी- 175
आयपीएल स्पर्धेत सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम ख्रिस गेल (Chris Gayle) याच्या नावावर आहे. गेलने स्पर्धेच्या सहाव्या हंगामात पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध खेळताना वादळी अंदाजात फलंदाजी करताना अवघ्या 66 चेंडूत 175 धावांची नाबाद दीडशतकी खेळी केली होती. त्याच्या खेळीत 13 चौकार आणि तब्बल 17 षटकारांचा समावेश होता. त्या हंगामापासून आतापर्यंत 9 हंगाम खेळले गेले आहेत, पण त्याचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे. (universe boss chris gayle revealed who will break record 175 runs ipl)
हेही वाचा-
‘सोनू’चा बड्डे: टी20 स्टार Suresh Rainaबद्दल ‘या’ खास 10 गोष्टी माहिती आहेत का?
रिंकूची विस्फोटक फलंदाजी पाहून कॅप्टन सूर्याला आली ‘या’ दिग्गजाची आठवण; म्हणाला, ‘सर्वांना माहितीये…’