सन २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकाचे भारतीय युवा संघाने विजेतेपद पटकावले होते. त्या संघाचा कर्णधार असलेला दिल्लीचा सलामीवीर फलंदाज उन्मुक्त चंद याने शुक्रवारी (१३ ऑगस्ट) वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंस्टाग्रामवर लिहिलेल्या या पत्रात त्याने आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर लिहिले पत्र
युवा विश्वविजेत्या संघाचा कर्णधार राहिलेल्या उन्मुक्तने शुक्रवारी अचानकपणे निवृत्तीची घोषणा केली. यासाठी त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पत्र लिहिले. या पत्रामध्ये तो म्हणाला,
‘माझे लहानपणापासून भारतीय संघाचे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न होते. मात्र, माझे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आयुष्यात मी आतापर्यंत बरेच काही मिळवले आहे.’
त्याने या पत्रामध्ये आपल्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. त्याने लिहिले,
‘मी मला या प्रवासात मदत करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझे कुटुंब नेहमी माझ्या पाठीशी राहिले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व दिल्ली क्रिकेट असोसिएशन यांनी मला संधी देत माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांचे विशेष आभार.’
https://www.instagram.com/p/CSgt7wxnufs/?utm_medium=copy_link
तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण
आपल्या कारकीर्दीविषयी उन्मुक्तने लिहीले,
‘एकोणीस वर्षाखालील विश्वचषक कर्णधार म्हणून जिंकणे माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. त्यामुळे मी माझ्या देशवासीयांना आनंद दिला होता. तसेच, मला भारत अ संघाचे नेतृत्व करण्याची संधी देखील मिळाली. माझे अंतिम ध्येय अजूनही जगातील सर्वोत्तम स्तरावर क्रिकेट खेळण्याचे आहे.’
अमेरिकेचे प्रतिनिधित्व करू शकतो उन्मुक्त
भारतीय क्रिकेटमधून कमी वयात निवृत्ती घेतल्याने उन्मुक्त इतर देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची दाट शक्यता आहे. तो कदाचित अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. २०१२ एकोणीस वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उन्मुक्तसह अंतिम फेरीत नाबाद खेळी करणारा यष्टीरक्षक स्मित पटेल याने देखील काही महिन्यांपूर्वीच निवृत्ती घेत, अमेरिकेसाठी खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याच दरम्यान उन्मुक्त हा देखील अमेरिकेत गेला होता. सध्या इतर देशांचे अनेक क्रिकेटपटू अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू कोरी अँडरसन, श्रीलंकेचा दिलशान मुनवीरा व पाकिस्तानचा सामी अस्लम यांचा समावेश आहे.
अशी राहिली कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व केलेल्या उन्मुक्तने ६७ प्रथमश्रेणी सामन्यात ३१.५७ च्या सरासरीने ३३७९ , १२० लिस्ट ए सामन्यात ४१.३३ च्या सरासरीने ४५.०५ व ७७ टी२० सामन्यात १५५६ धावा केल्या आहेत. एक वर्ष तो उत्तराखंड क्रिकेट संघाचा देखील सदस्य होता. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते.