मुंबई । भारताचा युवा खेळाडू उन्मुक्त चंद याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीच्या सुरुवातीला भन्नाट फलंदाजी आणि कल्पक ‘कप्तानी’ ने साऱ्यांनाच प्रभावित केले होते. 2012 साली 19 वर्षाखालील विश्वचषकात बलाढय़ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध अंतिम सामन्यात शतक ठोकून भारताला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या अचाट कामगिरीच्या जोरावर उन्मुक्तला दिल्लीच्या रणजी संघात स्थान मिळाले. मात्र अगदी मवाळ आणि कमालीचा शांत असलेल्या उन्मुक्तला राष्ट्रीय संघात स्थान पक्के मिळण्यात अपयश आले.
उन्मुक्त चंद नुकतेच आकाश चोप्रा यांच्याशी लाईव्ह संवाद साधत असताना दिल्लीच्या संघावर घणाघाती आरोप केले आहेत. उन्मुक्तच्या मते, ” दिल्ली रणजी संघातील खेळाडू हे नेहमी एकमेकांशी स्पर्धा करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.”
उन्मुक्त चंद दिल्लीच्या संघाबद्दल बोलताना म्हणाला की, “दिल्लीची रणजी टीम उत्तम प्रदर्शन करू शकली नाही याचे मुख्य कारण म्हणजे तो संघ एकजूट होऊन खेळत नाही. जेव्हा मी 19 एकोणीस वर्षांखालील विश्वचषक खेळून दिल्लीच्या ड्रेसिंग रुममध्ये आलो तर त्या ठिकाणी संघ भावना दिसली नाही. तेव्हा दिल्लीच्या संघातून खेळणारे गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग सारखे खेळाडू समर्थन करायचे. विदर्भाच्या संघाने जसे यश मिळवले तसे दिल्लीच्या संघाला यश मिळवता आले नाही. प्रत्येक खेळाडू स्वतःसाठी खेळतो. संघासाठी कोणीच खेळत नाही. सरावासाठी आलेले खेळाडू संघात एकत्रितपणे सराव न करता करत नाहीत. ते असे वागतात, जणू एखाद्या कंपनीत कामाला आल्यासारखे दोन चार तास सराव करतात आणि निघून जातात.”
उन्मुक्त चंद यांच्या विधानाचे समर्थन करत आकाश चोप्रा म्हणाला, बाकीच्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये असे वातावरण नाही. जेव्हा मी दिल्ली सोडून राजस्थानच्या संघांमध्ये गेलो तेव्हा असे तेथील ड्रेसिंग रूममध्ये आनंदाचे वातावरण होते. तेथील प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा करायचा. मला विश्वास बसत नव्हता की, असे पण वातावरण असू शकते, असे वातावरण मी दिल्लीत कधी पाहिले नाही. आकाश चोप्रा प्रमाणे उन्मुक्त चंद याने देखील मागील वर्षी दिल्लीचा संघ सोडून उत्तराखंड संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता .
या 27 वर्षीय खेळाडूने प्रथम श्रेणीच्या 67 सामन्यात 3379 धावा केल्या आहेत. यासोबत त्याने आयपीएलमध्ये 21 सामने खेळून 300 धावा काढल्या. एकोणीस वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार देखील मिळवला होता.