रविवार रोजी (२६ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा डबल हेडर झाला. यातील पहिला सामना दुसऱ्या टप्प्यात सलग २ सामने जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या या धाकधूक वाढवणाऱ्या सामन्यात चेन्नईने २ विकेट्सने बाजी मारली. त्यानंतर दुबईच्या शारजाह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. अखेर हर्षल पटेलच्या हॅट्रिकच्या जोरावर बेंगलोरने ५४ धावांनी हा सामना खिशात घातला.
या डबल हेडरनंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. कोलकाताला पराभूत करत एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघाने अव्वलस्थानी उडी घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांपैकी ८ सामने जिंकत १६ गुणांसह या स्थानावर ताबा मिळवला आहे. तर पराभवानंतरही कोलकाता संघ ८ गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे.
दुसरीकडे मुंबईला धोबीपछाड देत विराट कोहलीचा बेंगलोर संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. त्यांनी १० पैकी ६ सामने जिंकत १२ गुणांची कमाई केली आहे. मात्र हंगामातील या सलग दुसऱ्या पराभवानंतर मुंबई संघाचे मात्र ग्रह फिरले आहेत. यापूर्वी टॉप-५ मधून बाहेर पडलेला मुंबई संघ आता तर खालून दुसऱ्या म्हणजेच सातव्या स्थानावर घसरला आहे. त्यांच्या खात्यात राजस्थान रॉयल्सइतकेच ८ गुण असूनही नेट रन रेटमुळे त्यांची घसरण झाली आहे.
असे अंतिम सामन्यात पोहोचतात संघ
हंगामाच्या अंतिम टप्प्यात गुणतालिकेत पहिल्या २ स्थानांवर असलेल्या संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना खेळला जातो. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात धडक मारतो. तर पराभूत झालेल्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी अजून एक संधी मिळते. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांमध्ये इलिमिनेटर सामना होतो. यातील पराभूत झालेला संघ स्पर्धेतून बाहेर पडतो. तर विजयी संघाचा पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघाशी सामना रंगतो, याला दुसरा क्वालिफायर सामना असे म्हटले जाते. हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतो.
अशी आहे गुणतालिका
१. चेन्नई सुपर किंग्ज- १० सामने, ८ विजय, २ पराभव, १६ गुण
२. दिल्ली कॅपिटल्स- १० सामने, ८ विजय, २ पराभव, १६ गुण
३. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- १० सामने, ६ विजय, ४ पराभव, १२ गुण
४. कोलकाता नाईट रायडर्स- १० सामने, ४ विजय, ६ पराभव, ८ गुण
५. पंजाब किंग्ज- १० सामने, ४ विजय, ६ पराभव, ८ गुण
६. राजस्थान रॉयल्स- ९ सामने, ४ विजय, ५ पराभव, ८ गुण
७. मुंबई इंडियन्स- १० सामने, ४ विजय, ६ पराभव, ८ गुण
८. सनरायझर्स हैदराबाद- ९ सामने, १ विजय, ८ पराभव, २ गुण
महत्त्वाच्या बातम्या-
ॲक्शनला रिॲक्शन! षटकार मारल्यानंतर खुन्नस देणाऱ्या भरतची विकेट घेऊन चाहरने केला असा जल्लोष
गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहचलेल्यानंतर सीएसकेचा कर्णधार धोनी म्हणतोय, आम्ही…
धमाका! पुढील वर्षीच्या आयपीएल लीलावात ‘या’ पुणेकरासह पाच प्रतिभावान खेळाडू होणार मालामाल