उसेन बोल्ट आणि ऑलिंपिक हे २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकनंतर जणू एक समीकरण झाले आहे. २००४ ला जमैकाचा हा १७ वर्षीय खेळाडू ऑलिंपिकमध्ये सहभागी झाला आणि शर्यतीच्या जगात एक नवीन सितारा आल्याचा भास अनेकांना झाला. बोल्ट, या ऑलिंपिकमध्ये विशेष असे काही करू शकला नाही परंतु आपली छाप पाडण्यात तो यशस्वी ठरला.
वेळ आली ती २००८ बीजिंग ऑलिंपिकची. २१ वर्षीय बोल्ट या स्पर्धेत काय कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. बोल्ट, १०० मीटर, २०० मीटर आणि १*४०० मीटर रिले या खेळप्रकारात सहभागी झाला होता. १०० मीटर ही शर्यत गेली अनेक वर्ष सर्वाधिक पसंत केली जाणारी शर्यत आहे, म्हणूनच उसेन बोल्ट हा कायम चर्चेचा आणि माध्यमांचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. बोल्टने २००८ साली १०० मीटरमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करत ९.६९ सेकंदात शर्यत पूर्ण केली. त्याबरोबरच २०० मीटर शर्यत १९.३० सेकंदात पूर्ण करत त्याने आणखी एक विश्वविक्रम आपले नावे केला. त्याने ४*१०० रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावत बीजिंगमध्ये सुवर्णपदकांची हॅट्रिक साजरी केली.
२०१२ सालच्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत बोल्टच्या नावे १०० आणि २०० मीटरचा विश्वविक्रम ( आपला आधीच विक्रम मोडत ) आपल्या नावे केले होते. १०० मीटर ९.५८ सेकंड आणि २०० मीटर १९.१९ सेकंड असे बर्लिनच्या वर्ल्ड चॅम्पिअनशिप त्याने केले होते. लंडन ऑलिंपिकमध्ये बोल्टने १०० मीटर शर्यत ९.६३ सेकंदात जिंकली होती, शिवाय २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवत १९.३२ सेकंदाची वेळ नोंदवली होती. त्याबरोबरच बोल्टने ४*१०० मीटर रिले प्रकारात नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करत ३६.८४ सेकंदात शर्यत पूर्ण केली.
२०१६ सालचे रिओ ऑलिंपिक बोल्टचे शेवटचे ऑलिंपिक असेल असे त्याने घोषित केले होते. या ऑलिंपिक स्पर्धेत सर्वांना एकाच गोष्टीचे वेध लागले होते ते म्हणजे उसेन बोल्ट ‘ट्रिपल थ्री’ करणार का.? ट्रिपल थ्री म्हणजे तीनही ऑलिंपिक स्पर्धेत सर्व प्रकारात सुवर्णपदक मिळवण्याचा मान आणि असे करणारा तो जगातला एकमेव धावपटू ठरणार होता. बोल्टने प्रेक्षक आणि चाहत्यांना नाराज न करता सर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावत आपले नाव ऑलिंपिक इतिहासात कायमचे कोरले. त्याने १०० मीटर ९.८१ सेकंदात पूर्ण केले तर २०० मीटरसाठी १९.७८ सेकंद इतका वेळ घेतला.
अश्या या पृथ्वीतलावरच्या सर्वात वेगवान धावपटूने आपले नाव दिग्गजांच्या यादीत अव्वल स्थानी नेऊन ठेवले आहे असे म्हणणे वावगे नाही.