भारतीय संघाला अखेरची आयसीसी ट्रॉफी जिंकून आता एक दशकाचा काळ लोटला आहे. अशात चाहत्यांना आशा आहे की, भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये हा दुष्काळ संपवावा. कारण, भारत आपल्याच मायदेशात विश्वचषक खेळणार आहे. मागील महिन्यात 8व्यांदा आशिया चषक जिंकून रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ जगातील अव्वल संघ बनला आहे. दोन वेळच्या विश्वविजेत्या भारताने यावर्षी द्विपक्षीय मालिकेतील 21 सामन्यांपैकी 18 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदारही मानले जात आहे.
आगामी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेपूर्वी अधिकतर क्रिकेट जाणकारांना विश्वास आहे की, भारतीय संघावर खूपच दबाव असणार आहे. कारण, त्यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. तसेच ते यावेळी घरच्या मैदानांवर स्पर्धा खेळणार असल्यामुळे त्यांच्यासाठी मार्ग सोपा नसेल. अशात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यानेही मान्य केले की, भारत यावर्षी विश्वचषकात निर्विवादरीत्या विजयाचा दावेदार आहे. मात्र, त्याने हादेखील प्रश्न उपस्थित केला की, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याची सेना दबाव पेलू शकतील का?
काय म्हणाला ख्वाजा?
उस्मान ख्वाजा याने एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना म्हटले, “त्यांच्यावर (भारतीय संघ) खरंच जगात सर्वात जास्त दबाव आहे. जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. दिवसेंदिवस त्यांच्यावरील दबाव वाढतो. त्यामुळे ते धडपडले, जर त्यांनी सामने गमावले, जर ते स्पर्धेत मागे पडू लागले, तर मला माहितीये की, चाहते वास्तवात खूप वेगाने बदलू शकतात. हे दुधारी तलवारीसारखे आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “जेव्हा स्पर्धेच्या अखेरीस नॉक-आऊट असते, तेव्हा आणि अगदी सुरुवातीलाही जर काही व्यवस्थित नाही झाले, तर त्यांच्यावर खूपच दबाव असेल. त्यामुळे त्यांना याची खात्री करावी लागेल की, ते सर्वकाही व्यवस्थित करतील.”
ख्वाजा याच्या बोलण्यातील सत्यता यापूर्वीही पाहायला मिळाली आहे. जेव्हाही भारतीय संघ कोणत्याही मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा चाहते आपले संतुलन गमावतात आणि ट्रोलिंगला सुरुवात करतात. अशात यावेळी विश्वचषक भारतात होत असल्यामुळे भारतीय संघावर नक्कीच 140 कोटींहून अधिक चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं आहे.
भारतीय संघ स्पर्धेतील आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडेल. (usman khawaja on india said indian cricket team has the most pressure in the world)
हेही वाचा-
गाथा भारताच्या पहिल्या विश्वविजयाची! कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकलेलं जग
‘दररोज हैदराबादी बिर्याणी खाऊन…’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध हारल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान चर्चेत