वडोदरा। महाराष्ट्राचा टेबल टेनिस खेळाडू करण कुकरेजाने युटीटी 65 व्या राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत त्रिपुराच्या शुभ्रजित दासविरुद्ध मुलांच्या 17 वर्षाखालील गटातील पहिल्या पात्रता फेरीत 11-4, 11-6, 11-4 अशा फरकाने विजय मिळवला. स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली ही स्पर्धा वडोदरा येथील समा इनडोअर स्पोर्ट स्टेडियम येथे सुरु आहे.
मुलांच्या 17 वर्षाखालील गटातील अन्य एका सामन्यात तमिळनाडूच्या के हरिश व तेलंगणाच्या येले राजु यांनी विजय मिळवले. तर, चेन्नईच्या हरिशने मणिपूरच्या नंदेबाम बोलेक्सवर 11-3, 11-9, 11-8 असा, हैदराबादचा 14 वर्षीय येले राजूने गोव्याच्या रौनक नार्वेकरला 11-4, 11-3, 11-2 असा विजय नोंदवला. दरम्यान, मुलींच्या वर्षाखालील गटात गोव्याच्या स्तुती शिवानीने जम्मू -कश्मिरच्या दिव्यांशी शर्माला 9-11, 11-5, 11-7, 11-9 असे नमविले तर, पुदुच्चेरीच्या जयश्रीने उत्तरप्रदेशच्या सुविधा यादवला 11-7, 8-11, 11-1, 11-9 असे नमविले.
भारताचे माजी टेबल टेनिस खेळाडू कमलेश मेहता व प्रसिद्ध टेबल टेनिस प्रशिक्षक संदीप गुप्ता स्पर्धेच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. टेबल टेनिस असोसिएशन ऑफ बडोदा (टीटीएबी) व अल्टिमेट टेबल टेनिस (युटीटी) यांनी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने चांगल्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमुळे शालेय स्तरावर मुलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध असणार आहे. असे आठ वेळचे राष्ट्रीय चॅम्पियन म्हणाले.
त्यापुर्वी, सकाळच्या सत्रात स्पर्धेचे अनावरण करण्यात आले. यावेळी जयाबेन ठक्कर ( अध्यक्ष-टीटीएबी), डॉ. राजेश मिश्रा (सरचिटणीस/सीईओ-एसजीएफआय आग्रा), एच माधवन (बॅसिन मॅनेजर, ओएनजीसी-वडोदरा), कमलेश मेहता (संचालक युटीटी व अर्जुन पुरस्कार विजेते), जी एस पालीवाल (कार्यकारी संचालक (मार्केटिंग व एच आर) जीएसीएल, मोनालिसा बारुआ मेहता ( अर्जुन पुरस्कार विजेती), मुकेश कुमार तिवारी ( मुख्य जनरल मॅनेजर जीएआयएल- वडोदरा), संदीप गुप्ता (द्रोणाचार्य पुरस्कार विजेते), तनसुख छतबर ( ऑब्सर्व्हर व सरचिटणीस एसजीएफआय), कल्पेश ठक्कर (सचिव-टीटीएबी), गौरव दिक्षित (पीआरओ एसजीएफएफ) व रोहन भनाफे (सीईओ समा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) यांसह 38 विभागातील तब्बल 968 खेळाडू उपस्थित होते व हे खेळाडू 12 विविध गटात सहभाग नोंदवतील. ज्यामध्ये सहा सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचा सहभाग आहे.14, 17 आणि 19 वर्षाखालील गटात मुले व मुली यांचे सामने होतील.