पुणे, 23 जुलै 2023: भारताची स्टार मनिका बात्राने इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये रविवारी अविश्वसनीय खेळ केला. बंगळुरू स्मॅशर्सच्या खेळाडूने पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणेरी पलटन टेबल टेनिस संघाच्या हाना माटेलोव्हाचा पराभव केला. भारतातील सर्वोत्तम क्रमांकावरील मनिकाने हा सामना २-१ असा जिंकला. महिला एकेरीच्या सामन्यात स्मॅशर्सच्या खेळाडूचे वर्चस्व पाहायला मिळाले.
भारतीय टेबल टेनिस फेडरेशन (TTFI) च्या मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित लीगला प्रोत्साहन दिले आहे. २०१७ पासून सुरू झालेली लीग भारतातील टेबल टेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे.
जागतिक क्रमवारीत ३५व्या स्थानावर असलेल्या मनिकाने पहिल्या गेममध्ये पूर्णपणे पकड घेतली अन् ११-९ अशी बाजी मारली, परंतु हानाने दुसऱ्या गेममध्ये चांगले पुनरागमन केले व ११-८ अशा विजयाने सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मनिकाने लक्ष विचलित होऊ न देता ११-६ असा विजय मिळवला.
त्याआधी, जागतिक क्रमवारीत ५८व्या क्रमांकावर असलेल्या किरिलने २०१८च्या आयटीटीएफ आफ्रिकन-कप विजेत्या ओमार अस्सारवर २-१ असा विजय मिळवून बंगळुरू स्मॅशर्सला दणदणीत सुरुवात करून दिली होती. जागतिक क्रमवारीत २३व्या क्रमांकावर असलेल्या ओमारने पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ करताना ११-८ अशी बाजी मारली. पण, किरिल हार मानणाऱ्यातला नव्हता अन् त्याने पुढील दोन्ही गेममध्ये वर्चस्वपूर्ण खेळ केला. त्याने दुसरा गेम गोल्डन गुण घेताना ११-१० असा जिंकला. तिसरा गेमही गोल्डन गुणापर्यंत रंगला अन् किरिलने वर्चस्व गाजवले.