आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या उल्लेखनीय खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने अनेक सामन्यांमध्ये धमाकेदार सुरूवात करत जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना घाम फोडला. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 16 सामन्यांमध्ये 776 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली. या हंगामात त्याने 72 षटकार मारले आणि एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला, मात्र क्वालिफायर 2 मध्ये पराभूत झाल्याने संघ बाहेर पडल्याने त्याचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. दुसरीकडे रविवारी (31 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्यांदा चॅम्पियन बनले आणि कर्णधार रजत पाटीदारच्या नावावर एक खास विक्रम बनला.
रजत एका आयपीएल हंगामात विजेत्या संघाकडून सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 15 सामन्यांमध्ये 192.69 च्या स्ट्राईक रेटने 42 षटकारांसह 501 धावा केल्या. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 13 व्या स्थानी राहिला. त्याने शेन वॉटसनचा आठ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या माजी अष्टपैलूने आयपीएल 2018 मध्ये 35 षटकार मारले होते. त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना 15 सामन्यांमध्ये 555 धावा केल्या होत्या. त्या हंगामात सीएसकेने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैद्राबादला पराभूत केले होते. तसेच 2023 च्या हंगामात सीएसकेचा अष्टपैलू शिवम दुबेने 35 षटकार मारले होते. त्या हंगामात सीएसकेने अंतिम सामन्यात जीटीला पराभूत केले होते.
आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या संघासाठी एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
42 – रजत पाटीदार (2026)
35 – शेन वॉटसन (2018)
35 – शिवम दुबे (2023)
34 – अंबाती रायुडू (2018)
33 – सुनील नरेन (2024)
31 – डेव्हिड वॉर्नर (2016)
रजतने अंतिम सामन्यात एक चौकार आणि एका षटकारासह 13 चेंडूंत 15 धावा केल्या. “आयपीएलआधी मी नेट्समध्ये खूप फलंदाजीचा सराव केला. मी कशी सुधारणा करू शकेन, जसे काही तांत्रिक बदल यावर डीके भाई (दिनेश कार्तिक) यांच्याशी बरीच चर्चा केली. संघात सामील झाल्यानंतरही मी कठोर सराव करत राहिलो. यामुळे एक फलंदाज म्हणून मला स्पष्टता मिळाली”, असे रजतने अंतिम सामन्यानंतर म्हटले आहे.






