अंडर 19 आशिया कप 2024 च्या सामन्यात भारतानं यूएईचा 10 गडी राखून पराभव केला. शारजाहमध्ये बुधवारी टीम इंडियासाठी 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं धमाकेदार कामगिरी केली. त्यानं 76 धावांची खेळी केली. वैभवसोबत आयुष म्हात्रेनंही चमकदार कामगिरी केली. त्यानं नाबाद अर्धशतक झळकावलं. प्रथम फलंदाजी करताना यूएईनं 138 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात, भारतानं अवघ्या 16.1 षटकांत सामना जिंकला.
या सामन्यात यूएईनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान 44 षटकांत 137 धावा करून संघ ऑलआऊट झाला. यूएईसाठी रायन खाननं सर्वाधिक 35 धावा केल्या. त्यानं 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. कर्णधार इयान खान 5 धावा करून बाद झाला. भारतासाठी युधजित गुहानं 3 बळी घेतले. त्यानं 7 षटकात 15 धावा दिल्या. तर चेतन शर्मानं 8 षटकात 27 धावा देत 2 बळी घेतले. हार्दिक राजनं २ बळी घेतले. तर केपी कार्तिकेय आणि आयुष म्हात्रे यांना 1-1 विकेट मिळाली.
138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघानं अवघ्या 16.1 षटकांत विजय मिळवला. टीम इंडियासाठी वैभव सूर्यवंशीनं नाबाद 76 धावा केल्या. वैभवच्या या खेळीत 6 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. आयुष म्हात्रेनं 51 चेंडूंचा सामना करत नाबाद 67 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 4 चौकार आणि 4 षटकार मारले.
अंडर-19 आशिया कप 2024 मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता. या सामन्यात टीम इंडियाला 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर भारताचा सामना जपानशी झाला. टीम इंडियानं हा सामना 211 धावांनी जिंकला. आता भारतानं यूएईचा 10 गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाचा शेवटचा गट सामना श्रीलंकेविरुद्ध आहे, जो शारजाहमध्ये खेळला जाईल.
हेही वाचा –
दिवस-रात्र कसोटीत गुलाबी चेंडू का वापरतात? लाल आणि गुलाबी चेंडूत काय फरक असतो? सर्वकाही जाणून घ्या
विराट कोहली नाही तर हा खेळाडू बनू शकतो आरसीबीचा नवा कर्णधार!
भरकटलेल्या पृथ्वी शॉला दिग्गज क्रिकेटपटूंचा पाठिंबा, केविन पीटरसन म्हणाला…