---Advertisement---

वाढदिवस विशेष: शतकातील सर्वोत्तम झेल घेणारा ‘वेसबर्ट ड्रेक्स’

---Advertisement---

साल २००३ विश्वचषकातील वेस्ट इंडीज विरुद्ध कॅनडा सामन्यात कॅनडाचा दिग्गज फलंदाज जॉन डेव्हीसन हा तूफानी शतक करून खेळत होता. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांची बेरहम धुलाई त्याने केली होती. ७५ चेंडूत १११ धावांवर खेळत असताना डेव्हीसनने वॉवेल हींड याने टाकलेला चेंडू लॉंग ऑनला उंचावरून मारला. सर्वांना वाटले हा एक टप्पा चौकार जाईल पण..

लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या वेसबर्ट ड्रेक्स याने उलटा धावत येत, डाव्या हातात एक अविश्वसनीय झेल पकडला. त्यावेळी त्या झेलाला ‘शतकातील सर्वोत्तम झेल’ म्हटले गेले. त्यानंतर अशा प्रकारचे अनेक झेल, अनेक खेळाडूंनी घेतले. मात्र, ड्रेक्सचा तो झेल कोणताच क्रिकेटप्रेमी विसरू शकला नाही. आज, त्याच वेसबर्ट ड्रेक्सचा वाढदिवस..

५ ऑगस्ट १९६९ ला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक नामवंत खेळाडू देणाऱ्या बार्बाडोसमध्ये वेसबर्टचा जन्म झाला. सगळे खेळतात म्हणून छोट्या वेसबर्टने सुद्धा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. शालेय वयापासूनच गारफील्ड सोबर्स यांच्यासारखे अष्टपैलू व्हायचे त्याने ठरवले होते. अगदी काही पावलांच्या रन-अपने तो वेगवान चेंडू टाकत. सोबतच षटकार मारायची त्याची क्षमता देखील वाखाणण्याजोगी होती.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून वयाच्या २५ व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेत त्याने पूर्ण पाच सामने खेळले. पहिल्याच मालिकेत मात्र तो तितकासा यशस्वी ठरला नाही. पाच सामन्यात अवघ्या ३ विकेट आणि २५ धावा त्याच्या नावावर जमा झाल्या. त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

वेसबर्टने हार मानली नाही. घरेलू क्रिकेटमध्ये तो अधिकाधिक चांगली कामगिरी करत होता. शेवटी, त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. वयाच्या ३३ व्या वर्षी त्याने पुन्हा राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. तिशीनंतर पुनरागमन हे तितकेसे सहजासहजी होत नसत. मात्र, ड्रेक्सने इच्छाशक्ती व कामगिरीच्या जोरावर ते करून दाखवले.

ड्रेक्स क्रिकेट इतिहासातील त्या पाच खेळाडूंपैकी एक आहे जे ‘टाईम आउट’ पद्धतीने बाद झाले होते. २००२ मध्ये त्याची निवड फ्री स्टेट संघाविरुद्धच्या सामन्यासाठी बॉर्डर संघात झाली होती. त्यावेळी तो, श्रीलंकेत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत होता. त्याने बॉर्डर संघाच्या व्यवस्थापनाला सांगितले की, तो वेळेवर संघात हजर होईल. व्यवस्थापनाने त्याचा समावेश अंतिम ११ मध्ये केला. मात्र, विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्याने तो वेळेवर पोहोचू शकला नाही. जेव्हा तो फलंदाजीसाठी उतरू लागला तेव्हा, पंचांनी त्याला क्षेत्ररक्षण न केल्या कारणांनी ‘टाईम आऊट’ पद्धतीने बाद दिले.

२००३ विश्वचषकातील कॅनडा विरुद्धच्या सामन्यात डेव्हिसनचा तो लाजवाब झेल घेतल्यानंतर कॅनडाची धावसंख्या १५६-२ इथून २०२ वर सर्वबाद अशी झाली होती. त्याच सामन्यात ड्रेक्सने ४४ धावा देऊन ५ बळी आपल्या नावे केले होते. त्याचे कारकिर्दीतील ते पहिले पंचक होते.

ड्रेक्ससाठी २००३ क्रिकेट विश्वचषक खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला. त्याने सहा सामन्यात १३.०० च्या सरासरी व ४.१ इकॉनॉमी रेटने १६ बळी मिळवले होते. त्याच्या, शानदार कामगिरी नंतरही वेस्ट इंडिजचा संघ उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरू शकला.

२००३ विश्वचषकातील त्याच्या या कामगिरीचे श्रेय द. आफ्रिकेतील प्रथमश्रेणी संघ बॉर्डरला जाते. ड्रेक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नव्हता तेव्हा बॉर्डरने त्याच्यावर विश्वास दाखवत, सात वर्ष त्याला क्रिकेट खेळण्याची संधी दिली. त्याने १९९६ ते २००३ या काळात बॉर्डरचे प्रतिनिधित्व केले. बॉर्डर सोबतच, ड्रेक्सने चार इंग्लिश काउंटी संघांचे संघांचे प्रतिनिधित्व केले. यात, ससेक्स, वार्विकशायर, लिस्टरशायर व नॉटिंघमशायर यांचा समावेश होतो.

२००३ साली वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध कसोटीमध्ये विश्वविक्रमी ४१८ धावांचा पाठलाग केला होता. तो सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात्तम सामना म्हणून गणला जातो. शिवनारायण चंद्रपॉल १०४ धावांवर बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या ३७२-७ अशी होती.आठव्या विकेटसाठी ड्रेक्सने ओमारी बँक्ससोबत ४६ धावांची भागीदारी करून वेस्ट इंडिजला सनसनाटी विजय मिळवून दिला. ड्रेक्स २७ धावांवर नाबाद राहिला होता.

प्रामुख्याने, आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ड्रेक्सने फलंदाजीतही चार प्रथमश्रेणी शतके ठोकली आहेत. त्यातील दोन आपला घरेलू संघ बार्बाडोस तर दोन ससेक्ससाठी होती. त्याची सर्वोच्च धावसंख्या १८० इतकी राहिली.

निवृत्तीनंतर, ड्रेक्सने क्रिकेट प्रशिक्षणात आपले हात आजमावले. २००८ मध्ये त्याने यूएई राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. २०१५ साली वेस्टइंडीज महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी त्याची निवड झाली. वेस्टइंडीज महिला क्रिकेट संघाने २०१६ टी२० विश्वचषक ड्रेक्सच्याच प्रशिक्षणाखाली जिंकला.

ट्रेंडिंग लेख –

५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक

क्रिकेटच्या टी-२० प्रकारात सर्वाधिक चेंडू खेळणारे ७ क्रिकेटर, २ आहेत भारतीय

धोनीच्या लाडक्या खेळाडूसह या ५ क्रिकेटर्सचं नशीब आयपीएलमध्ये राहिलं खराब

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---