संपूर्ण भारत देशामध्ये सध्या कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी या आजाराच्या विळख्यात सापडत असून, हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दुर्धर आजारात भारतीय महिला संघाची अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमूर्ती हिने आपली आई व बहीण यांना दोन आठवड्याच्या आत गमावले. एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना वेदा यामधून कशी बाहेर आली याचा खुलासा तिने केला.
वेदाने गमावली आई आणि बहीण
कर्नाटकची रहिवाशी असलेल्या वेदाने अवघ्या दोन आठवड्याच्या कालावधीत आपली आई व मोठी बहीण वत्सला यांना गमावले होते. तसेच, तिच्या घरातील एकूण ९ सदस्यांना या आजाराची लागण झालेली.
या बिकट परिस्थितीतून आपण कशी बाहेर आली याविषयी सांगताना ती म्हणाली, “आजाराचे निदान झाल्यावर सर्वजण घाबरले होते. माझी बहीण गेल्यावर मी देखील त्याच परिस्थितीतून चाललेले. मात्र, अशा परिस्थितीत मानसिक स्वास्थ्य आणि कणखरता महत्त्वपूर्ण ठरते. एक खेळाडू म्हणून मी मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा प्रयत्न करत होते.”
यासोबतच वेदाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांचेदेखील विचारपूस करण्यासाठी आभार मानले. आजारी खेळाडूंच्या कुटुंबीयांची खबरबात न विचारल्यामुळे बीसीसीआयवर चाहत्यांनी निशाणा साधला होता.
या खेळाडूंच्या कुटुंबियांचे झाले निधन
कोरोना या साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेत काही क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांना या आजाराची लागण झाली. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग तसेच भारताच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य लेगस्पिनर पियुष चावला या दोघांच्याही वडिलांचे या आजारात निधन झाले. तसेच महिला संघाचे यष्टिरक्षक प्रिया पूनिया हिच्या आईचे देखिल याच आजारामुळे देहावसान झालेले. वृद्धिमान साहा, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर व अमित मिश्रा हे भारतीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप फायनल: जडेजा की अश्विन, कोण असेल भारतीय संघाचा विघ्नहर्ता?
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कधीही शुन्यावर बाद न झालेले दोन भारतीय क्रिकेटपटू
सध्याच्या भारतीय संघातील ३ गोलंदाज, ज्यांनी विलियम्सनला कसोटीत केले सर्वाधिकवेळा बाद