भारतात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसची स्थिती बिकट होत आहे. रोज लोखोंमध्ये रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यातच वैद्यकिय सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सध्या केवळ सामान्य जनताच नाही तर अनेक सेलिब्रेटी त्यांचे कुटुंबिय देखील अडकले आहेत. नुकतेच भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीच्या आईचे आणि बहिणीचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. त्यामुळे वेदाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मागील महिन्यात वेदाची आई आणि बहिण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी झाली होती. त्यानंतर मागील महिन्यात २४ एप्रिल रोजी तिने तिच्या आईच्या निधनाबद्दल ट्विटवरुन सर्वांना माहिती दिली होती. त्यानंतर आता गुरुवारी (६ मे) तिच्या बहिणीचेही निधन झाले. त्यामुळे सध्या वेदाच्या कुटुंबाबद्दल क्रिकेट जगतातून हळहळ व्यक्त होत आहे.
यानंतर वेदाने ट्विटरवर भावनिक संदेश लिहिला आहे. तिने ट्विट केले आहे की ‘माझ्या कुटुंबाने काल रात्री खूप दु:खाने माझ्या आक्काला (बहिणीला) शेवटचा निरोप दिला. तुमच्या प्रार्थाना आणि संदेशाबद्दल धन्यवाद. या कठीण काळातून जाणाऱ्या प्रत्येकाबद्दल मी सहानुभूती व्यक्त करते. तुमच्या प्रेमळ माणसांना घट्ट धरुन ठेवा आणि सुरक्षित राहा.’
https://twitter.com/vedakmurthy08/status/1390330708321652740
वेदाने यापूर्वीच हे देखील सांगितले होते की तिचा स्वत:चा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या भारतातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहून जगभरातून भारतासाठी प्रार्थना केली जात आहे. अनेक क्रिकेटपटूंनीही कोरोना व्हायरसच्या लढ्यात मदतीचा हात पुढे केला आहे.
वेदाची कामगिरी
वेदाही भारतीय महिला संघाची नियमित सदस्य आहे. तिने २०११ साली भारतीय संघात पदार्पण केले होते. तिने आत्तापर्यंत ४८ वनडे आणि ७६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. वनडेमध्ये तिने ८२९ धावा केल्या. तर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये तिने ८७५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –