महाराष्ट्राला किंबहुना जगाला ‘सैराट’ सारखा हिट सिनेमा देण्यामागचे खरे श्रेय नागराज मंजुळे यांनाच जाते. मराठी सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरची सगळी गणिते बदलून टाकणारा असा हा दिग्दर्शक आहे. मुळात नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून ते केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेतेही आहे.
खरे तर अगदी त्याने बनवलेल्या ‘पिस्तुल्या’ या पहिल्या शॉर्टफिल्मलाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे तिथूनच मंजुळे यांच्या उज्वल कामगिरीचा प्रवास सुरु होतो. पुढे पहिल्या सिनेमाला म्हणजेच फॅन्ड्रीनिमित्तही त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आणि मग सैराटची विक्रमी घोडदौड वेगळी सांगायला नको.
सैराटच्या अफाट यशानंतर प्रेक्षकांच्या नागराजच्या कामाबद्दलच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. तो आता नवीन काय करत आहे हे बघण्याची सर्वानांच इच्छा आहे. प्रेक्षकांची ही इच्छा ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ मुळे पूर्ण होणार आहे. झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या कुस्तीच्या महासंग्राच्या प्रोमोजचे दिग्दर्शन केल्यानंतर नागराजने स्वतःची एक टीम विकत घेतली आहे.
वीर मराठवाडा असे या टीमचे नाव आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून सामाजिक भान दाखवून देत संवेदनशीलतेची जाणीव करून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे महाराष्ट्रातल्या खेळाबाबत ही तितकेच सजग आहेत. नागराजनिमित्त महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या कुस्तीसारख्या मैदानी खेळला जोपासण्यासाठी आणखीन एक मातीशी घट्ट नाळ असलेला सेलिब्रिटी जोडला गेला आहे. वीर मराठवाडाचे संघमालक नागराज सांगतात, ‘मला या उपक्रमाशी जोडला गेल्याचा खूप आनंद आहे. हे व्यासपीठ नक्कीच आपल्या मातीतल्या खेळाला आणखीन पुढे आणण्यासाठीचे सकारात्मक पाऊल ठरेल. सर्व टीम्सना सदिच्छा!’
नागराजच्या या टीममध्ये अनेक मोठमोठे कुस्तीवीर आहेत. यात आंतरराष्ट्रीय कुस्ती प्लेयर जबुरयान मिहरान (५७), युपी महाराष्ट्र केसरी २०१८ किरण भगत (८६+), एशियन चॅम्पियनशिप २०१७ कांस्यपदक विजेती स्वाती शिंदे (५५), महाराष्ट्र केसरी २०१७ सुवर्णपदक विजेता दत्ता नारळे (८६), स्टेट चॅम्पियनशिप २०१८ सुवर्णपदक विजेता अरुण खेंगळे (७४), सब ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप २०१७मध्ये खेळलेला शुभम थोरात (६५) यांचा समावेश होतो.
त्यासोबतच राखीव खेळाडूंमध्ये महाराष्ट्र केसरी २०१७ रौप्यपदक विजेता अनिल जाधव (८६), महाराष्ट्र केसरी २०१५ रौप्यपदक विजेता गोकुळ आवारे (८६+), ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप २०१६ कांस्यपदक विजेता प्रताप पाटील (६५), स्टेट चॅम्पियनशिप २०१८ रौप्यपदक प्रतीक्षा देबाजे (५५), महाराष्ट्र केसरी २०१७ रौप्यपदक विजेता दिनेश मोकाशी (७४) आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप २०१८मध्ये खेळलेला वैभव यादव (५७) अशी नावे आहेत. नागराजचा हा कुस्ती संघ मुसंडी मारण्यासाठी सज्ज आहे असे म्हणायला हवे.