---Advertisement---

Womens T20 Challenge: हरमनप्रीतची विस्फोटक फिफ्टी व्यर्थ, वेलोसिटीने सुपरनोव्हाजला ७ विकेट्सने चारली धूळ

Velocity-vs-Supernovas
---Advertisement---

महिला टी२० चॅलेंजमधील दुसरा सामना मंगळवारी (दि. २४ मे) सुपरनोव्हाज विरुद्ध वेलोसिटी संघात पार पडला. हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर खेळला गेला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या सुपरनोव्हाज संघाला वेलोसिटी संघाने ७ विकेट्सने धूळ चारली. या विजयामुळे वेलोसिटी संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला. हा सामना जरी वेलोसिटीने जिंकला असला, तरीही सामनावीर पुरस्काराची मानकरी सुपरनोव्हाज संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ठरली.

या सामन्यात वेलोसिटी (Velocity) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या सुपरनोव्हाज (Supernovas) संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १५० धावा चोपल्या. या धावांचे आव्हान वेलोसिटी संघाने १८.२ षटकात फक्त ३ विकेट्स गमावत पूर्ण केले. अशाप्रकारे वेलोसिटीने ७ विकेट्सने सामना खिशात घातला.

वेलोसिटी संघाकडून खेळताना शेफाली वर्मा आणि लॉरा वोल्वार्ड यांनी अर्धशतकी खेळी केली. शेफालीने ३३ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ५१ धावा चोपल्या. दुसरीकडे, लॉरानेही ३५ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा चोपल्या. याव्यतिरिक्त कर्णधार दीप्ती शर्मा हिने नाबाद २४ धावा आणि यास्तिका भाटिया हिने १७ धावा केल्या. नत्थकन चांथम हिला फक्त १ धाव करण्यात यश आले.

यावेळी सुपरनोव्हाज संघाकडून गोलंदाजी करताना डिएंड्रा डॉटिन हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने ३.२ षटके गोलंदाजी करताना २१ धावा देत २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तिच्याव्यतिरिक्त पूजा वस्त्राकार हिने १ विकेट आपल्या नावावर केली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाज संघाकडून कर्णधार हरमनप्रीत हिने सर्वाधिक धावा चोपल्या. तिने ५१ चेंडूत ७१ धावांची वादळी खेळी केली. या धावा करताना तिने ३ षटकार आणि ७ चौकारांची बरसात केली. तिच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटिया हिला ३६ आणि सून लूस हिला २० धावा करता आल्या. इतर ४ फलंदाजांना यावेळी साधा १० धावांचा आकडाही पार करता आला नाही. त्यामुळे संघाला अपेक्षित आव्हान देता आले नाही.

यावेळी वेलोसिटी संघाकडून गोलंदाजी करताना केट क्रॉस हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने ४ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तसेच, दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १ विकेटवर आपले नाव कोरले.

महिला टी२० चॅलेंज स्पर्धेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (दि. २६ मे) पुण्याच्याच एमसीए क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळला जाईल. हा सामना वेलोसिटी आणि ट्रेलब्रेझर्स संघात पार पडेल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

क्वालिफायर सामन्याच्या आधीच साहाने दिली स्वतःच्या फिटनेसविषयी महत्वाची अपडेट, वाचा काय म्हणाला

हरमनप्रीतच्या सुपरनोव्हाजने स्म्रीतीच्या ट्रेलब्रेझर्सची केली पळता भुई थोडी, ४९ धावांनी जिंकला सामना

यंदाच्या हंगामात फ्लॉप ठरूनही वेंकटेश अय्यरला टीम इंडियात मिळाली संधी, काढणार का दक्षिण आफ्रिकेचा घाम?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---