भारताचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसविषयी मागच्या बऱ्याच दिवसांपासून तक्रारी समोर आल्या आहेत. असे असले तरीही आगामी टी-२० विश्वचषकात त्याला भारतीय संघात संधी दिली गेली आहे. यानंतर अनेकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, तरीही त्याला संघात कायम ठेवले गेले. अशात आता बीसीसीआयने हार्दिकबाबत खबरदारीचा उपाय म्हणून एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल २०२१ मध्ये नव्याने मिळालेला उत्कृष्ट अष्टपैलू वेंकटेश अय्यरला टी-२० विश्वचषकासाठी संधी दिली जाणार असल्याचे समजत आहे. त्याला आयपीएलनंतर हार्दिक पांड्याच्या पर्यायी खेळाडूच्या रूपात संघाच्या बायोबबलमध्ये सामील होण्याच्या सुचाना दिल्या गेल्या आहेत.
आगामी टी-२० विश्वचषकासाठी हार्दिक पांड्या भारतीय संघात फलंदाजाच्या रूपात सामील केले गेले आहे. याचे प्रमुख कारण त्याला मागच्या बऱ्याच दिवसांपासून गोलंदाजी करताना पाहिले गेले नाही. त्यामुळे बीसीसीआयने केकेआरच्या वेंकटेश अय्यरला संघात त्याचा पर्यायी खेळाडूच्या रूपात सामील केले गेले असल्याची चर्चा आहे. तो फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही माहीर आहे.
अय्यरने या आयपीएलच्या हंगामात केकेआरसाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे आणि संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यामध्ये त्याचा मोठा हात राहिला आहे. वेंकटेश अय्यरने आयपीएलच्या या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात निवडकर्त्यांना प्रभावित करणारे प्रदर्शन केले आहे. त्याने हंगामातील ८ सामन्यांमध्ये ३७.८५ ची सरासरी आणि १२३.२५ च्या स्ट्रइक रेटने २६५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ८.५३ च्या इकोनॉमीने तीन विकेट्सही घेतल्या आहेत.
दुसरीकडे हार्दिक त्याच्या फिटनेसच्या तक्रारीमुळे सध्या गोलंदाजी करू शकत नसल्याचे दिसत आहे. त्याने आयपीएलच्या चालू हंगामात एकही चेंडू फेकलेला नाही आणि यानंतर त्याच्यावर अधिक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हार्दिकने आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी १२ सामने खेळले आहेत आणि यामध्ये १४.११ च्या सरासरीने व ११३.२९ च्या सरासरीने १२७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा पंच असलेल्या वडिलांनी ‘बाप’ निर्णय घेत फलंदाज मुलाला दिले होते बाद
‘मला तुझा अभिमानच आहे’, कर्णधार म्हणून अंतिम सामन्यातही फेल झालेल्या कोहलीचे बहिणीने वाढवलं मनोबल
वॉर्नरने सोडले मौन, सनरायझर्सने कॅप्टन्सीवरुन काढण्यामागचे कारण न सांगितल्याचा खळबळजनक खुलासा