अखेर 118 सामन्यानंतर विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मोसमातील अंतिम सामन्याचे समीकरण स्पष्ट झाले आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भ विरूद्ध सौराष्ट्र यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. विदर्भाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली असून, मागील हंगामात चॅम्पियन होण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. त्यावेळी विदर्भाला उपविजेत्या म्हणून समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या वर्षी विदर्भ पूर्ण ताकदीने मैदानात उतरून चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करणार आहे. विदर्भाला अंतिम सामन्याचा अनुभव असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जास्त आहे, तर सौराष्ट्रला विदर्भाविरुद्ध अंतिम सामन्यात कशी कामगिरी करता येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सौराष्ट्रने उपांत्य फेरीत पंजाबवर मात करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विदर्भाने उपांत्य फेरीत कर्नाटकचा डाव धुव्वा उडवत गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली आहे. विदर्भाच्या संघाचे नेतृत्व हर्ष दुबे करत असून, सौराष्ट्रच्या संघाचे कर्णधारपद हार्विक देसाई सांभाळणार आहे. या महाअंतिम सामन्यात दोन्ही संघाकडून उत्साही प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना रविवारी, 18 जानेवारी रोजी बंगळुरुतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेन्स ग्राउंड 1 मध्ये खेळवण्यात येणार आहे. सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल, तर टॉस दुपारी 1 वाजता होईल. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल, तर जिओहॉटस्टार अॅपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर देखील थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.
अंतिम सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. सौराष्ट्रकडून विश्वराज जडेजा आणि विदर्भाकडून अमन मोखाडे यांच्याकडून धमाकेदार प्रदर्शनाची अपेक्षा आहे. विश्वराज जडेजाने उपांत्य फेरीत 127 चेंडूत 165 धावा केल्या होत्या, तर अमन मोखाडेने 122 चेंडूत 138 धावा करत विदर्भाला विजय मिळवून दिला होता. या दोन युवा खेळाडूंच्या झुंजार खेळावर अंतिम सामन्याचे चित्र ठरेल, आणि त्यांच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष लागून राहणार आहे.






