दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात केपटाऊन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी दरम्यानचे चेंडू छेडछाड प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहे. असे असतानाच एक धक्कादायक खुलासा आज सर्वांसमोर आला आहे.
या सर्व प्रकरणामागे ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर मुख्य सूत्रधार आहे. आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत खुलासा केला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणानंतर लगेचच त्यांची चौकशीसाठी एक समिती दक्षिण आफ्रिकेत पाठवली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वृत्तानुसार या चौकशीत चेंडू छेडछाडीची योजना वॉर्नरची होती असे आढळून आले आहे.
तसेच त्यानेच सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला असे गैरवर्तन करण्यास सांगितले होते आणि ते कसे करायचे हे देखील सांगितले होते.
याआधीही वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डिकॉक यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यात वाद झाले होते. त्यानंतरही चाहत्यांकडून डेव्हिड वॉर्नरला डिवचण्यात आले होते. त्यामुळे वॉर्नर आधीच या सर्व गोष्टींवर संतप्त होता.
या सर्व प्रकारामुळे मात्र क्रिकेट चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. वॉर्नरच्या या गैरवर्तवणुकीमुळे त्याच्यावर तसेच त्याला चेंडू छेडछाड प्रकरणात साथ देणारा त्याचा संघसहकारी स्टीव्ह स्मिथवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
केपटाऊनला झालेल्या त्या सामन्यात स्मिथ कर्णधार होता. त्याला चेंडू छेडछाडीच्या प्रकरणाबाबत सर्व माहिती असतानाही त्याने वॉर्नरला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तसेच त्यानेच बॅनक्रॉफ्टला पिवळा टेप लपवण्यास सांगितला होता. यामुळे स्मिथलाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
या प्रकरणात संघातील सर्वात लहान असणाऱ्या बॅनक्रॉफ्टला चेंडू छेडछाड कारण्याबाबत वॉर्नरचे ऐकल्याबद्दल आणि स्मिथच्या सांगण्यानुसार पिवळा टेप लपवण्याबद्दल कारवाईला सामोरे जावे लागले आहे. तसेच या तिघांवरही सामनाधिकाऱ्यांचीही दिशाभूल करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.





