नागपूर। विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात विदर्भाने पहिल्यांदाच इराणी कपचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. हा सामना आज पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला. पण पहिल्या डावात विदर्भाने घेतलेल्या आघाडीच्या जोरावर त्यांना विजेतेपद बहाल करण्यात आले.
विदर्भाने शेष भारताविरुद्ध पहिल्या डावात तब्बल ७ बाद ८०० धावा केल्या होत्या. या डावात अनुभवी फलंदाज वासिम जाफरने विक्रमी द्विशतक केले होते. त्याने २८६ धावांची दमदार खेळी केली. इराणी कप इतिहासातील ही सर्वोच्च वयक्तिक खेळी ठरली आहे.
तसेच त्याला गणेश सतीश(१२०) आणि अपूर्व वानखडे(१५७*) यांनी शतके करत भक्कम साथ दिली. याच जोरावर विदर्भाने पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवली.
त्यानंतर विदर्भाने शेष भारताचा पहिला डाव ३९० धावातच रोखला. रणजी ट्रॉफी गाजवलेल्या रजनीश गुरबानीने या डावात विदर्भाकडून ७० धावात ४ विकेट्स घेऊन महत्वाची कामगिरी बजावली. त्याचबरोबर आदित्य सरवटेने ३ आणि उमेश यादवने २ विकेट्स घेतल्या.
तसेच शेष भारताकडून पहिल्या डावात जीएच विहारीने(१८३) शानदार शतक केले होते. त्याचबरोबर पृथ्वी शॉ(५१) आणि जयंत यादवने(९६) अर्धशतकी खेळी केली. यादवचे शतक फक्त ४ धावांनी हुकले. या तिघांनीही चांगली लढत दिली पण बाकी फलंदाजांनी खास काही केले नाही.
यानंतर दुसऱ्या डावात अक्षय वाडकरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विदर्भाने बिनबाद ७९ धावा केल्या. विदर्भ यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेट मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेट प्रकारात अपराजित राहिला आहे. त्यांनी यावर्षी रणजी ट्रॉफीचेही विजेतेपद मिळवले होते.
संक्षिप्त धावफलक:
विदर्भ पहिला डाव: ७ बाद ८०० धावा
(विदर्भ :वासिम जाफर-२८६ धावा, गणेश सतीश -१२०धावा, अपूर्व वानखडे १५७* धावा
शेष भारत: सिद्धार्थ कौल- २ विकेट्स)
शेष भारत पहिला डाव: सर्वबाद ३९० धावा
(शेष भारत: जीएच विहारीने -१८३ धावा, जयंत यादव – ९६ धावा, पृथ्वी शॉ- ५१ धावा
विदर्भ: रजनीश गुरबानी: ४ विकेट्स)
विदर्भ दुसरा डाव: बिनबाद ७९ धावा
(संजय रामास्वामी – २७* धावा, अक्षय वाडकर- ५०* धावा)
सामनावीर: वासिम जाफर