विदर्भ विजय हजारे ट्रॉफी 2024-25 च्या फायनलमध्ये पोहचणारा दुसरा संघ बनला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं महाराष्ट्राचा 69 धावांनी पराभव केला. आता विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना विदर्भ आणि कर्नाटक यांच्यात खेळला जाईल. हा सामना 18 जानेवारी रोजी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर होईल.
शानदार फॉर्ममध्ये असलेला विदर्भाचा कर्णधार करुण नायरचं सलग पाचवं लिस्ट ए शतक अवघ्या 12 धावांनी हुकलं, अन्यथा तो एक विश्वविक्रम ठरला असता. त्यानं फक्त 44 चेंडूत 88 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्यानं 5 उत्तुंग षटकार आणि 9 चौकार मारले. नायरनं स्पर्धेतील सात डावांमध्ये 752 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच शतकांचा समावेश आहे. संपूर्ण स्पर्धेत तो फक्त एकदाच बाद झाला. विदर्भानं शेवटच्या सात षटकांत 108 धावा केल्या. ज्यामुळे विदर्भाला 380 धावांपर्यंत पोहोचता आलं.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना विदर्भाचे सलामीवीर राठोड आणि शौरी यांनी पहिल्या विकेटसाठी 34.4 षटकांत 224 धावा जोडल्या. दोघांनीही त्यांच्या शतकी खेळीदरम्यान समान 14 चौकार आणि एक षटकार मारला. यानंतर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या महाराष्ट्राला कधीही लक्ष्याच्या जवळ जाता आलं नाही. कर्णधार ऋतुराज गायकवाड फक्त सात धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला तर अनुभवी राहुल त्रिपाठी 27 धावा काढून बाद झाला.
तथापि, फक्त दुसरा सामना खेळणाऱ्या युवा अर्शिन कुलकर्णीनं एक टोक सांभाळत अनुभवी अंकित बावणेसोबत चौथ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या कुलकर्णीनं 101 चेंडूत 90 धावांची खेळी केली, ज्यामध्ये आठ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. बावणेनं 49 चेंडूत 50 धावा केल्या, ज्यात पाच चौकारांचा समावेश होता.
बावणे आणि कुलकर्णी यांच्या विकेट पडल्यानंतर, विकेटकीपर फलंदाज निखिल नाईकनं 26 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 49 धावा केल्या, परंतु तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
हेही वाचा –
4 शहरं, 5 टीम, 22 मॅच! महिला प्रीमियर लीग 2025 चे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्रात अंतिम सामना
आरसीबीचा ‘फ्लाइंग मॅन’! हवेत उडी मारून घेतला अद्भूत झेल; व्हायरल VIDEO पाहा
अविश्वसनीय! वनडे क्रिकेटमध्ये या भारतीय फलंदाजाची तीन आकडी सरासरी, आता तरी संघात संधी मिळेल का?