मुंबई। भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू गुरुवारी (२१ जानेवारी) यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन भारतात परतले. भारतात परतल्यानंतर सर्वांचेच उत्साहात स्वागत झाले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत प्रभारी कर्णधार म्हणून मोठे यश मिळवलेल्या अजिंक्य रहाणेचे विशेष स्वागत मुंबईत करण्यात आले. सध्या त्याच्या या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रहाणेचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
व्हिडिओमध्ये दिसते की अजिंक्य रहाणेच्या माटुंग्यातील घराजवळ ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी तो राहत असलेली पूर्ण सोसायटी त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होती. त्यांनी मोठ्या उत्साहाने त्याचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी रहाणेला पाहून त्याची दिडवर्षाची मुलगी आर्या देखील त्याला बिलगली होती. तसेच त्याची पत्नी राधिका देखील त्याच्यासोबच होती. रहाणेचे सोसायटीतील काही महिलांनी औक्षणदेखील केले. रहाणेनेही कोणाला नाराज न करता सर्वांनी केलेले स्वागत स्विकारले.
विशेष म्हणजे त्याच्या सोसायटीजवळ एक मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्यात त्याच्या कर्णधारपदाची आकडेवारी लिहिली होती. रहाणेने ५ कसोटी सामन्यांत आत्तापर्यंत भारताचे नेतृत्व केले असून त्यातील ४ सामन्यात विजय मिळाला आहे. तर १ सामना अनिर्णित राहिला आहे. खास गोष्ट अशी की रहाणेच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत भारतीय संघाने कधीही पराभव स्विकारलेला नाही.
विराट पालकत्व रजेवर असल्याने रहाणेला नेतृत्वाची संधी –
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला होता. त्यामुळे या कसोटी मालिकेतील उर्वरित ३ कसोटी सामन्यात रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
India's series winning captian Ajinkya Rahane receiving a grand welcome as he returns back home in Mumbai. #INDvAUS #AUSvIND pic.twitter.com/bc22dizSYL
— Gav Joshi (@Gampa_cricket) January 21, 2021
रहाणेचे यश –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर विराटने पालकत्व रजा घेतल्याने उर्वरित सामन्यांत रहाणेने नेतृत्वाची जबाबदारी घेत संघाला मालिकेत पुनरागमन करुन दिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे कसोटीत विजय मिळवले, तसेच सिडनी येथे सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले. त्यामुळे भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकून इतिहास घडवला.

कौतुकास्पद गोष्ट अशी की या मालिकेदरम्यान भारताचे अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त होत होते. असे असताना एका युवा खेळाडूंच्या संघाने रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना ही मालिका जिंकली. त्यातही ब्रिस्बेन येथे गेल्या ३२ वर्षानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा पराक्रमही रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीचा टीसी असतानाचा रोल परफेक्ट जमावा, म्हणून कष्टाळू सुशांतने खरोखर केले होते टीसीचे काम
समाजाला महत्त्वपुर्ण संदेश देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वापरलं पुजाराचं उदाहरण, ट्विट व्हायरल
सुशांत सिंग राजपूत म्हणाला होता, धोनी आणि माझी कहानी सारखीच…






