---Advertisement---

VIDEO: “मी सिलेक्टर असतो, तर लगेच वैभवला टीम इंडियामध्ये घेतले असते,” भारतीय दिग्गजाचे वक्तव्य

On: गुरूवार, मे 28, 2026 6:41 PM
---Advertisement---

सलग आपल्या दुसऱ्या आयपीएल हंगामात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने अनेकांना त्याच्या फलंदाजी शैलीने भुरळ घातली आहे. अगदी महान सचिन तेंडुलकरपासून ते स्फोटक ख्रिस गेलपर्यंत अनेक दिग्गजांनी बिहारच्या या 15 वर्षीय मुलावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. बुधवारी (27 मे) आयपीएल 2026 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद असा खेळला गेला. यामध्ये वैभवने 29 चेंडूंत 97 धावांची खेळी करत पुन्हा एकदा सर्वाना प्रभावित केले. तो लगेच भारतीय संघात हवा आहे, असे म्हणणाऱ्या भारतीय दिग्गजाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

विरेंद्र सेहवाग या व्हिडिओमध्ये वैभवच्या अप्रतिम फलंदाजीचे कौतुक करत आहे. तो म्हणतो, “मी अशी फलंदाजी कधीच पाहिली नाही. मी सुद्धा भारतासाठी वनडेमध्ये सर्वात जलद शतक झळकावले आहे, पण ज्या पध्दतीने हा मुलगा फलंदाजी करत आहे, ते पाहून कोणी कल्पनाही केली नसेल की एक 15 वर्षांचा मुलगा ख्रिस गेलचा 59 षटकारांचा विक्रम मोडेल. जर मी निवड समितीचा सदस्य असतो, तर मी त्याला आत्ताच भारतीय संघात घेतले असते.”

सामन्याची स्थिती पाहिली तर हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वैभवने सुरूवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने 16 चेंडूंतच अर्धशतकी खेळी केली होती, हे पाहून तो गेलचा आयपीएलमधील सर्वात जलद शतकाचा आणि सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडतो की काय असे एका क्षणाला वाटत होते. वैभव आठव्या षटकात बाद झाला, जर आणखी काही षटके खेळला असता तर त्याने गेलचा 175 धावांचा विक्रम मोडला असता.

वैभवने या सामन्यात अनेक विक्रमे रचली, बरोबरी केली. त्याने सुरेश रैनाचा आयपीएल प्लेऑफ सामन्यांमधील सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. रैनाने 2014 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना क्वालिफायर 2 मध्ये 16 चेंडूंमध्येच 50 धावांचा टप्पा गाठला होता. तसेच वैभवने गेलचा एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक 59 षटकारांचा विक्रम मागे टाकला. आता त्याने 15 डावांत 65 षटकार मारले आहेत.

वैभवच्या या भन्नाट खेळीने राजस्थानने 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 243 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैद्राबादचा संघ 19.2 षटकांतच 196 धावसंख्येवर सर्वबाद झाला. वैभव सामनावीर ठरला. आता क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानचा सामना 29 मे रोजी गुजरात टायटन्सशी होईल.

वैभवची सध्या श्रीलंका दौऱ्यासाठी इंडिया ए संघात निवड झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---