महिला विश्वचषक २०२२ मध्ये असा काही नजारा पाहायला मिळतो, ज्यामुळे पाहणाऱ्याच्या डोळ्यावरही विश्वास बसत नाही. असेच काहीसे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघातील सामन्यात पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे, महिला खेळाडूंना फिटनेसवरून बोलणाऱ्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला, तर त्यांनाही म्हणावं लागेल की, ‘महिलाही कुणापेक्षा कमी नाहीत.’ या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक बेथ मूनीने स्लिपमध्ये शानदार डाईव्ह मारत, ज्या अंदाजात कॅच पकडला, त्यामुळे प्रत्येकजण मूनीचा दीवाना झाला आहे. तिचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडच्या डावाच्या सहाव्या षटकात दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना मूनीने (Beth Mooney) उजव्या बाजूने सुमारे दोन मीटर लांब हवेत डाईव्ह मारली आणि हा कॅच पकडला. न्यूझीलंडची फलंदाज अमेलिया केरने (Amelia Kerr) बाहेर जाणारा चेंडू डाईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या बाहेरची कड घेऊन तिसऱ्या स्लिपकडे जात असताना ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक बेथ मूनीने लांब डाईव्ह मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. मूनी ब्रिस्बेनमध्ये राहणारी ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. ती महिला बिग बॅश लीग संघ ब्रिस्बेन हीटकडूनही खेळते.
मूनीच्या कॅचचा व्हिडिओ आयसीसीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “बेथ मूनीचा उत्कृष्ट झेल, अमेलिया केरला बाद करण्यासाठी एका हाताने घेतला कॅच.”
https://www.instagram.com/reel/CbBucpqF2V-/?utm_source=ig_embed&ig_rid=e43cba34-f7ae-4ec7-9b0a-2c5e16aa5557
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला १४१ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने ८ गडी गमावून २६९ धावा केल्या होत्या. २७० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची फलंदाजी अत्यंत खराब झाली आणि संपूर्ण संघ ३० षटकात १२८ धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात सलग तिसरा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या यादीत ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढील सामना १६ मार्चला इंग्लंडशी होणार आहे.
Video: न्यूझीलंडची सुपरवुमन! विश्वचषकात ग्रीनने एलिसा पेरीचा घेतलेला झेल पाहून व्हाल थक्क