बंगळूरु। आज (2 आॅक्टोबर) विजय हजारे ट्रॉफी 2018 स्पर्धेत मुंबईने गोव्याचा नवव्या फेरीत 7 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईच्या या विजयात नाबाद शतक करणाऱ्या अखिल हेरवाडकरने शतक करत मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात गोव्याने मुंबईसमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना जय गोकुळ बिश्त आणि अखिलने चांगली सुरुवात केली होती. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 54 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली.
पण बिश्तला(32) क्रिष्णा दासला बाद करत ही जोडी तोडली. बिश्त बाद झाल्यावर लगेचच कर्णधार श्रेयस अय्यरनेही विकेट गमावली. त्याच्यापाठोपाठ काही वेळात सुर्यकुमार यादवला अमुल्य पांड्रेकरने बाद केले.
यानंतर मात्र सिद्धेश लाडने(26*) अखिलला चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 94 धावांची नाबाद भागीदारी रचली. अखिलने 112 चेंडूत नाबाद 108 धावांची खेळी करताना 11 चौकार आणि 4 षटकार मारले.
त्याच्या या शतकाच्या जोरावर मुंबईने 35.3 षटकात 189 धावा करत 7 विकेट्सने विजय मिळवला.
गोव्याकडून क्रिष्णा दासने 2 आणि अमुल्य पांड्रेकरने 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, गोव्याने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 186 धावा केल्या होत्या. गोव्याकडून सुयश प्रभुदेसाई आणि अमित वर्मा यांनी चांगली लढत दिली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
प्रभुदेसाईने 56 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यात त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. तर अमितने 73 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्य़ा सहाय्याने 49 धावा केल्या. तसेच अन्य फलंदाजांपैकी अमोघ देसाईने 24, किनम वाझने 29 आणि विशंभर कहलॉनने 11 धावा केल्या
मात्र बाकी फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. मुंबईकडून धवल कुलकर्णीने 3 तर रॉयस्टन डायस, शाम्स मुलानी आणि शिवम दुबेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
–विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी
–विजय हजारे ट्राॅफी: विदर्भाचा महाराष्ट्रावर 3 विकेट्सने विजय