दिल्ली। आज कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्र यांच्यामध्ये विजय हजारे ट्रॉफी २०१८ ची अंतिम लढत होणार आहे. या दोन्ही संघांची कामगिरी या स्पर्धेत चांगली झाली आहे.
कर्नाटकने उपांत्य सामन्यात महाराष्ट्राचा ९ विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर सौराष्ट्राने आंध्रप्रदेशला ५९ धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
कर्नाटककडून मयंक अग्रवालने दमदार कामगिरी करताना या स्पर्धेत आत्तापर्यंत ६३३ धावा केल्या आहेत. त्याने उपांत्य सामन्यातही अर्धशतकी खेळी करून कर्नाटकला विजय मिळवून दिला होता. तसेच त्याची यावर्षीच्या देशांतर्गत मोसमाची कामगिरी अफलातून राहिली आहे. त्याच्याबरोबरच कर्णधार करूण नायरनेही उपांत्य सामन्यात मयंकला भक्कम साथ देताना अर्धशतक केले होते.
तसेच त्यांच्या गोलंदाजांनी आणि अष्टपैलू खेळाडूंनीही कामगिरी चांगली केली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्टुअर्ट बिन्नी, कृष्णप्पा गॉथम आणि श्रेयश गोपाळ सौराष्ट्रासाठी धोकादायक ठरू शकतात. तसेच सौराष्ट्राच्या फलंदाजीपुढे या स्पर्धेत १४ विकेट्स घेणारा एम प्रसिद्ध कृष्णा आणि १३ विकेट्स घेणाऱ्या गोपाळचे आव्हान असेल त्याचबरोबर कर्नाटकाच्या या गोलंदाजांना टी प्रदीपच्या गोलंदाजीचीही साथ मिळेल.
कर्नाटकची २०१७-१८ या मोसमातील देशांतर्गत कामगिरी चांगली राहिली आहे. त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती पण त्यांना विदर्भाकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच कर्नाटक संघाने सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्येही उत्तम कामगिरी केली होती पण या स्पर्धेतही त्यांना अंतिम फेरीत धडक मारण्यात अपयश आले होते. त्यामुळे कर्नाटक आज विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरतील.
सौराष्ट्राकडून त्यांचा कर्णधार चेतेश्वर पुजाराकडून अपेक्षा आहेत. तसेच अर्पित वसावद, समर्थ व्यास आणि अवी बारोट यांचीही या स्पर्धेतील कागिरी चांगली झाली आहे. सौराष्ट्राची ताकद ही त्यांच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये आहे.
प्रेरक मंकड आणि चिराग जानीने अष्टपैलू खेळ केला आहे. तसेच मधल्या षटकात गोलंदाजी करताना धर्मेंद्र जडेजा या फिरकीपटूने जबरदस्त कामगिरी करताना आत्तापर्यंत १६ विकेट्स घेतल्या आहेत. दोन्ही संघ सारख्या ताकदीचे असल्याने आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
केव्हा होणार हा सामना?
आज कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात विजय हजारे ट्रॉफी २०१८ चा अंतिम सामना होणार आहे.
कुठे होईल हा सामना?
कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्र संघात होणारा विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होणार आहे. याआधी या दोन्ही संघांनी त्यांचे उपांत्य फेरीचे सामने याच मैदानांवर खेळले आहेत.
किती वाजता सामना सुरु होणार?
सकाळी ९.०० वाजता कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्र यांच्यातील अंतिम सामन्याला सुरुवात होईल.
हा सामना कोठे पाहता येणार?
कर्नाटक आणि सौराष्ट्र दरम्यान होणार हा अंतिम सामना हॉटस्टार या वेबसाइटवर ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ
कर्नाटक : करुण नायर (कर्णधार), मयंक अगरवाल, रविकुमार समर्थ, अनिरुद्ध जोशी, रितेश भटकळ, सीएम गौतम (श्रेकस), श्रेयस गोपाळ, कृष्णप्पा गॉथम, प्रदीप टी, पवन देशपांडे, प्रसिध कृष्णा, प्रवीण दुबे, जगदीश सुचित, स्टुअर्ट बिन्नी, श्रीनाथ अरविंद , रोनीत मोरे, शरथ बीआर, देवदत्त पदिककल
सौराष्ट्र: चेतेश्वर पुजारा (कर्णधार),जयदेव शहा, अवी बारोट, अर्पित वासवद, हिमालय बारद, शेल्डन जॅक्सन, धर्मेंद्रसिंग जाडेजा, रवींद्र जडेजा, चिराग जानी, कमलेश मकवाना, प्रेरक मंकड, हार्डिक राठोड, शौर्य सानंदिया, रॉबिन उथप्पा, समर्थ व्यास