देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने सोमवारी (28 नोव्हेंबर) पार पडले. या सामन्यांमध्ये कर्नाटकने पंजाबचा, महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा, सौराष्ट्राने माजी विजेत्या तमिळनाडूचा व आसामने जम्मू-कश्मीरचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने झकावलेले शानदार द्विशतक या संपूर्ण दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
सरदार वल्लभ भाई पटेल स्पोर्ट्स एरेना, अहमदाबाद येथे सुरू असलेल्या या बाद फेरीच्या दुसऱ्या दिवशी उपांत्यपूर्व फेरी खेळली गेली. दिवसातील पहिल्या सामन्यात कर्नाटकने पंजाबचे आव्हान स्वीकारले. 3 बाद 34 अशी दयनीय अवस्था झालेली असताना पंजाबसाठी अष्टपैलू अभिषेक शर्मा धावून आला. त्याने 109 धावांची खेळी करत संघाला 235 पर्यंत मजल मारून दिली. कर्नाटकसाठी कावेरापाने सर्वाधिक चार बळी मिळवले. त्यानंतर कर्नाटकने सलामीवीर रवीकुमार समर्थ याच्या अर्धशतकाच्या जोरावर 4 गडी राखून विजय संपादन केला.
दिवसातील दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश ही लढत अटीतटीची होईल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने संपूर्ण लक्ष आपल्याकडे वळवून घेतले. त्याने नाबाद द्विशतकी खेळी केली. सोबतच एकाच षटकात तब्बल सात षटकार ठोकण्याचा विश्वविक्रमही आपल्या नावे केला. त्याच्या योगदानामुळे महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेशसमोर 331 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या उत्तर प्रदेशचे युवा अष्टपैलू राजवर्धन हंगारगेकर याने पाच बळी घेत कंबरडे मोडले. परिणामी महाराष्ट्राने 58 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
प्रथमच उपांत्यपूर्व फेरी खेळत असलेल्या जम्मू-कश्मीर व आसाम यांच्यातील सामना चांगलाच रंगला. शुभम खजुरिया व हेनान नझीर यांच्या शतकांमूळे जम्मू काश्मीरने 350 धावा उभारल्या होत्या. मात्र, या संपूर्ण स्पर्धेत तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या रियान पराग याने 174 व रिशव दासने 114 धावांची खेळी करत संघाला चार षटके आधीच विजय मिळवून दिला. चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात सौराष्ट्र संघाने दिलेले 295 धावांचे आव्हान गतविजेता तामिळनाडू संघ पेलवू शकला नाही. त्यांना 44 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
उपांत्य फेरीचे सामने आता 30 नोव्हेंबर रोजी खेळले जातील. पहिल्या उपांत्य सामन्यात सौराष्ट्र विरुद्ध कर्नाटक तर दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध आसाम अशी लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 2 डिसेंबर रोजी होणार आहे.
(Vijay Hazare Trophy Semi Final Lineups)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“शिखर 2023 च्या विश्वचषकात नक्कीच खेळेल” संघ सहकारी अजूनही आश्वस्त
VIDEO: आयपीएल संघांनो सावधान! ऋतुराजने एका ओव्हरमध्ये ठोकलेत तब्बल 7 षटकार