पुणे। पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांची महाराष्ट्राच्या पथक प्रमुख पदी निवड झाली असून तालुका क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांची उपपथक प्रमुख पदी निवड झाली आहे. क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. विजय संतान यांनी मागील वर्षी खेलो इंडियाचे महाराष्ट्राचे उपपथक प्रमुख म्हणून काम पाहिले होते.
विजय संतान हे पुण्याचे जिल्हा क्रीडाधिकारी असून मागील ३० वर्षांपासून क्रीडाक्षेत्रात कार्यरत आहेत. १५ वर्षांपासून ते विविध जिल्हयातील जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वर्धा, अमरावती, चंद्रपूर,यवतमाळ, गडचिरोली, हिंगोली, नागपूर याठिकाणी त्यांनी जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. यासोबत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर देखील ते कार्यरत आहेत आणि महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.
अरुण पाटील हे तालुका क्रीडाधिकारी असून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत ते पदक विजेते असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू म्हणून कामगिरी केली आहे.