स्टार कुस्तीपटू विनेश फोगटनं आता राजकारणात एंट्री केली आहे. तिनं हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी शुक्रवारी (6 सप्टेंबर) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनेशनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या वादावर मोठं वक्तव्य केलं. ऑलिम्पिकमधील अपात्रतेच्या मुद्द्यावर ती म्हणाली की, न्यायालयात खटला सुरू असून तिचा लढा अजूनही सुरू आहे. आपण यात नक्कीच जिंकू, असा विश्वास तिनं व्यक्त केला.
ऑलिम्पिकमधील वादावर विनेश म्हणाली, “माझा जो लढा सुरू होता, तो अजूनही संपलेला नाही. सध्या कोर्टात केस सुरू आहे. ती केस आम्ही नक्कीच जिंकू. जीवनाच्या लढाईत मी कधीही हार मानली नाही. आता या नव्या प्रवासात देशाप्रती असलेली माझी भावना फक्त बोलण्यापुरती मर्यादित राहणार नाही.” विनेश फोगट पुढे म्हणाली की, ती आता लोकांमध्ये राहून कठोर परिश्रम करणार आहे. या स्टार कुस्तीपटूनं दावा केला की, जे काही तिच्या नियंत्रणात आहे, त्यानुसार ती लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करेल.
जेव्हा विनेशला ऑलिम्पिकबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, “पॅरिस ऑलिम्पिकमध्ये माझ्याविरुद्ध कट झाला होता की नाही, याचं उत्तर मी नंतर कधीतरी देईन. हा माझ्यासाठी खूप भावनिक विषय आहे. मी माझ्या आयुष्यभराच्या मेहनतीनं इथपर्यंत पोहचली आहे. मी यावर सर्व माहिती सविस्तर देईन. पण त्या विषयावर बोलण्यासाठी मला सर्वांसमोर सत्य मांडण्यासाठी भावनिक तयारी करावी लागेल.”
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटच्या अपात्रतेवरून मोठा वाद झाला होता. फायनलपूर्वी तिचं वजन निर्धारित 50 किलोपेक्षा अवघं 100 ग्रॅम जास्त भरलं होतं. त्यामुळे तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. यानंतर विनेशनं तिला किमान रौप्य पदक देण्यात यावं, यासाठी न्यायालयात अपील केली. मात्र तिची अपील फेटाळण्यात आली. यामुळे विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमधून पदकाशिवाय परतावं लागलं. विनेश या प्रकरणी अजूनही न्यायालयात लढा देत आहे. आता तिनं काँग्रेस पक्षात प्रवेश करून राजकारणातही दंड ठोकण्याची तयारी केलीय.
विशेष म्हणजे, विनेश फोगटनं गेल्या वर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात मोठं आंदोलन केलं होतं. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी यौन शोषणाचे आरोप लगावले होते. तेव्हापासूनच विनेशच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
हेही वाचा –
कुस्तीपटू विनेशसोबत बजरंगनेही रेल्वे नोकरी सोडली; लवकरच राजकारणात प्रवेश!
मुशीर खानचं नाव दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अजरामर, नवदीप सैनीसोबत मिळून रचला अद्भुत रेकॉर्ड!
भारत विरुद्ध बांगलादेश मालिका कधीपासून सुरू होणार? कोणत्या चॅनलवर दिसतील लाईव्ह सामने?