माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला बुधवारी (1 जानेवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 52 वर्षीय कांबळीला 21 डिसेंबर रोजी मूत्रमार्गात संसर्ग आणि स्नायूंना दुखापत झाल्याच्या तक्रारीनंतर भिवंडीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर सुमारे 10 दिवस उपचार करण्यात आले. भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळलेला कांबळी सध्या मोठ्या आर्थिक संकटाशी झुंज देत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना खूप भावूक दिसत होता. त्यानं भारताची एकदिवसीय क्रिकेटची नवीन जर्सी घातलेली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कांबळी म्हणाला की, डॉक्टरांनी त्याला तंदुरुस्त केलं आहे. तसेच मी तंदुरुस्त झाल्यावर परत येईन असं सांगितलं होतं, हे ही त्यानं नमूद केलं. यावेळी कांबळीनं नवीन वर्ष साजरं करताना लोकांना दारू न पिण्याचा सल्ला दिला.
90च्या दशकात आपल्या फलंदाजीनं जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारा विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून स्वत:चा फोन नाही. ‘न्यूज 18’ च्या वृत्तानुसार, मोबाईलच्या दुरुस्तीसाठी पंधरा हजार रुपये फी भरू न शकल्याने एका दुकानदारानं त्याचा आयफोन हिसकावला होता. कांबळी यांच्या पत्नी अँड्रिया हेविट यांनी सांगितलं की, त्यांची सोसायटी त्यांच्याकडून 18 लाख रुपयांच्या थकबाकी रकमेची मागणी करत आहे. यामुळे त्यांना त्यांचं घर गमवावं लागू शकतं.
याआधी सोमवारी विनोद कांबळीचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये कांबळी हॉस्पिटलमध्ये पूर्ण उत्साहात डान्स करताना दिसत आहे. कांबळीला अल्कोहोल आणि इतर आरोग्याच्या समस्या आहेत. अलीकडेच, दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान तो अत्यंत अशक्त दिसला होता. या समारंभात कांबळीला उठून उभं राहताना देखील अडचण जात होती.
हेही वाचा –
मुंबईच्या 17 वर्षीय फलंदाजाची कमाल, यशस्वी जयस्वालचा विश्वविक्रम मोडला!
भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! हेड कोच गौतम गंभीरबाबत रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीम इंडियासोबत यशस्वी का होत नाहीयेत? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या