कोरोना व्हायरसचा जगभरात वाढता प्रादुर्भाव पाहता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१९ मार्च) देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी रविवारी (२२ मार्च) सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ‘सार्वजनिक कर्फ्यू’ लावण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी मोदी म्हणाले की, या १४ तासादरम्यान कोणत्याही व्यक्तीने आपले घर सोडू नये. तसेच रस्त्यावर फिरू नये. जमावबंदी म्हणजे लोकांनी एकत्र यायचं नसतं. तर कर्फ्यु अर्थात संचारबंदी. यावेळी लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरायचं नसतं.
पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Narendra Modi) ‘सार्वजनिक कर्फ्यू’ (Public Curfew) चे आवाहन केल्यानंतर आता त्यांच्या या आवाहनाला क्रीडाजगतातून पाठिंंबा मिळत आहे.
यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंंटवरून ट्वीट केले की, “कोरोना व्हायरस धोक्याचा सामना करण्यासाठी सावध, चौकस आणि जागरूक रहा. आदरणीय पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या सुरक्षेसाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे.”
तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) ट्वीट केले की, “आपण पंतप्रधान मोदींबरोबर २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ‘सार्वजनिक कर्फ्यू’ला पाठिंबा देऊया. आपल्याला एक राष्ट्र म्हणून संयम बाळगण्याची आवश्यकता आहे.”