भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळला गेलेला तिसरा टी२० सामना ऑस्ट्रेलियाने १२ धावांनी जिंकला. भारत या सामन्यात पराभूत झाला असला तरी, भारताने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेवर २-१ अशा फरकाने कब्जा केला. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले १८७ धावांचे लक्ष्य पार करताना, भारतीय कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची खेळी करत भारताकडून एकहाती किल्ला लढवला. हे त्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० क्रिकेटमधील सातवे अर्धशतक होते. या अर्धशतकासोबतच विराटने एकाच देशाविरुद्ध सर्वाधिक टी२० अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम केला.
ऑस्ट्रेलियाने वाचवला क्लीन स्वीप
पहिल्या दोन टी२० सामन्यात पराभूत झालेल्या, ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा उभारल्या. ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षक-सलामीवीर मॅथ्यू वेडने सर्वाधिक ८० धावा केल्या. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने तुफानी ५४ धावा चोपत ऑस्ट्रेलियन धावसंख्येला आकार दिला. भारताकडून ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने २ बळी घेतले. टी नटराजन व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी आपल्या नावे केला.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी निराशजनक झाली. केएल राहुल शून्यावर तंबूत परतला. त्यानंतर, कर्णधार विराट कोहली व अनुभवी शिखर धवन यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, लेगस्पिनर स्वॅपसनने ९ ते १२ या षटकांदरम्यान तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. विराट व अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी फटकेबाजी करत भारताच्या विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, एका षटकाच्या अंतरात दोघेही बाद झाल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.
विराटचा आणखी एक पराक्रम
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातील आपले २५ वे अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह विराटने एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक टी२० अर्धशतके ठोकणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला. विराटने आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत दुसर्या स्थानीदेखील विराटच आहे. विराटने वेस्ट इंडिज विरुद्ध आत्तापर्यंत ५ अर्धशतके ठोकण्याची किमया केली आहे.
श्रीलंकेच्या कुसल परेरा आणि भारताच्या रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध प्रत्येकी ५ टी२० अर्धशतके काढत, या विशिष्ट यादीत अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळवले आहे. त्यानंतर पुन्हा, रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध व ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने श्रीलंकेविरुद्ध पाच अर्धशतके झळकावण्याची कामगिरी केली आहे.
विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत नवव्या स्थानी आहे. त्याच्यासोबत या यादीमध्ये भारताचे केएल राहुल व रोहित शर्मा हे अव्वल दहामध्ये आहेत. ते अनुक्रमे तिसऱ्या आणि दहाव्या स्थानी विराजमान आहेत.
संबंधित बातम्या:
– ब्रेकिंग: आयसीसी टी२० क्रमवारी जाहीर, पाहा टीम इंडिया आहे कोणत्या स्थानावर
– विराटचा आणखी एक कारनामा! आता केली ही खास कामगिरी
– विराटला बेसबॉलच्या रूपात पाहिलंय का? मेजर बेसबॉल लीगने केला मजेशीर फोटो शेअर






