सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आजपासून चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्याच दिवशी खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा या सामन्यात पार केला आहे. त्याने जेव्हा या सामन्यात 11 धावा केल्या तेव्हा त्याने हा टप्पा पूर्ण केला. या 19 हजार धावा त्याने 399 व्या डावात केल्या आहेत.
त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 19 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 432 डावात 19 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर त्याच्या पाठोपाठ ब्रायन लाराने 433 डावात 19 हजार धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या होत्या.
विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 15 हजार, 16 हजार, 17 हजार आणि 18 हजार धावा करणाराही फलंदाज आहे.
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 333 डावात 15 हजार धावा केल्या होत्या. तर 16 हजार धावा त्याने 350 डावात, 17 हजार धावा 363 डावात आणि 18 हजार धावा 382 डावात पूर्ण केल्या होत्या.
आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट जगातील एकूण 12 वा तर तिसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी भारतीय खेळाडूंध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने हा टप्पा पार केला आहे.
विराट या सामन्यात 23 धावांवर असताना जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 19 हजार धावा पूर्ण करणारे फलंदाज –
399 डाव – विराट कोहली
432 डाव – सचिन तेंडुलकर
433 डाव – ब्रायन लारा
444 डाव – रिकी पॉटिंग
458 डाव – जॅक कॅलिस
महत्त्वाच्या बातम्या:
–एका तासांत केएल राहुलबद्दल झाले तब्बल ५१३४ ट्विट, भारतात पहिल्या नंबरवर ट्रेंडिंग
–क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?
–सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकरांचे मुंबईत निधन