अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. दिवस-रात्र स्वरुपात खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजानी पाहुण्यांचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्या डावात अवघ्या ११२ धावांवर इंग्लंड संघ गारद झाला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाखेर यजमान संघ ३ बाद ९९ धावांवर खेळत आहे. यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
इंग्लंडच्या ११३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १६ षटकांत भारताने २ विकेट्स गमावल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटला खास कामगिरी करता आली नाही. ५८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २७ धावांची खेळी त्याने केली. अखेर ३२.२ षटकात जॅक लीचने त्याचा त्रिफळा उडवला.
परंतु २७ धावांच्या छोटेखानी खेळीसह विराटने कर्णधाराच्या रुपात इंग्लंडविरुद्ध २००० धावांचा आकडा गाठला आहे. यासह तो इंग्लंडविरुद्ध २००० धावांचा टप्पा पार करणारा भारताचा पहिला आणि जागतिक क्रिकेटमधील पाचवा कर्णधार बनला आहे. याआधी ही कामगिरी ऑस्ट्रेलियाचा अॅलन बॉर्डर (३१९१), दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (२९७८), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (२७२६) आणि ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन (२४३२) यांनी केली होती.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विराटची आकडेवारी
या सामन्यापुर्वीही विराटला इंग्लंडविरुद्ध मोठ्या आकडी धावा उभारता आल्या नाहीत. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याने कशाबशा ६२ धावा जोडल्या. तत्पुर्वी पहिलाय सामन्यातही ११ आणि ७२ धावांची कामगिरी त्याने केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
जब मिलेंगे तीन यार…! माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने शेअर केला खास फोटो
मोदींना साथ देणार दिंडा! माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने केला बीजेपीत प्रवेश
रूटला बाद केल्यानंतर विराटचे सेलिब्रेशन पाहिले का?, व्हिडिओ होतोय व्हायरल