मुंबई| आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबईने 46 धावांनी विजय मिळवला आहे.
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरसमोर 214 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठा विक्रम केला आहे.
विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. हा विक्रम करताना त्याने चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाला मागे टाकले.
विराट आज जेव्हा 34 धावांवर पोहोचला त्याचवेळी त्याने आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम रैनाच्या नावावर होता.
हा विक्रम विराटने त्याच्या 153 व्या सामन्यात केला आहे. त्याने हा विक्रम करताना रैनापेक्षा 10 सामने कमी खेळले आहेत. रैनाने 163 आयपीएल सामन्यात 33.76 च्या सरासरीने 4558 धावा केल्या आहेत.
रैना पोटरीच्या दुखापतीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाब विरूध्दच्या सामन्यात खेळला नव्हता. तसेच त्याला या दुखापतीमुळे 20 एप्रिलला होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यालाही मुकावे लागणार आहे.
विराटने आज 62 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या आहेत. यात त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
विराट कोहली: 4619 धावा
सुरेश रैना: 4558 धावा
रोहीत शर्मा: 4345 धावा
गौतम गंभीर: 4210 धावा
डेव्हीड वॉर्नर: 4014 धावा