टी२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारतीय संघ त्याचा स्पर्धेतील चौथा सामना खेळला. या सामन्यात भारतासमोर स्कॉटलंडचे आव्हान होते. भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात विराटने संघासाठी नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याची आशा कायम ठेवण्याच्या दृष्टीने भाराताला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते. शुक्रवारी कर्णधार विराटचा वाढदिवस देखील होता. त्याने या सामन्यादरम्यान स्वत:च्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
कर्णधार विराटचा शुक्रवारी ३३ वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला संघासाठी टी२० विश्वचषकात सामना खेळण्याची आणि संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. असे क्वचितच पाहायला मिळते की, एखाद्या खेळाडूचा वाढदिवस आहे आणि त्यादिवशी त्याला देशासाठी खेळण्याची किंवा संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहलीला ही संधी मिळाली.
विराट टी२० विश्वचषकात वाढदिवसाच्या दिवशी संघाचे नेतृत्व करणारा पहिलाच पुरुष खेळाडू ठरला आहे. विराटपूर्वी जागतिक क्रिकेटमधील एकाही पुरुष खेळाडूला टी२० विश्वचषकात त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती.
दरम्यान, भारतीय संघ टी२० विश्वचषकाची सुरुवात चांगली करू शकला नाही. विश्वचषकातील त्याच्या पहिच्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून १० विकेट्सने मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धही भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि संघाने सामना गमावला. तिसऱ्या सामन्यात मात्र भारतीय फलंदाजांनी केलेल्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर संघाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला.
आता चौथ्या सामन्यात भारताने स्कॉटलंडला पराभूत केले आहे. स्कॉटलंडचा संघ भारताविरुद्ध १७.४ षटकांत ८५ धावांवरच सर्वबाद झाला. तर, भारताने ८६ धावांचे आव्हान ६.३ षटकांतच पूर्ण केले.
गुणतालिकेचा विचार केला, तर ग्रुप दोनमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन संघ ग्रुप दोनमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ग्रुप एकच्या गुणतालिकेचा विचार केला तर, यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शेन वॉर्न पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! रिऍलिटी टीव्ही स्टारने केला अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप
विराट कोहली झाला ३३ वर्षांचा! क्रिकेट जगतातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव, पाहा खास ट्वीट्स
‘विक्रमवीर’ विराटचा वाढदिवस, बीसीसीआय शेअर केला खास व्हिडिओ