अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला दिवस-रात्र सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. हा सामना कसोटी मालिकेतील तिसरा सामना असल्याने भारताने कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडीही घेतली आहे. याबरोबरच हा विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरला आहे. त्याने या विजयासह एमएस धोनीचा एक मोठा विक्रम मागे टाकला आहे.
विराटचा कर्णधार म्हणून हा मायदेशातील २२ वा कसोटी विजय होता. त्यामुळे त्याने भारताकडून कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या यादीत माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने भारतात कर्णधार म्हणून २१ विजय मिळवले आहेत.
याबरोबरच विराट हा मायदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या जगातील एकूण कर्णधारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने स्टिव्ह वॉ यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वॉ यांनी देखील मायदेशात कर्णधार म्हणून २२ विजय मिळवले आहेत. या यादीत ३० विजयांसह अव्वल क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर २९ विजयांसह रिकी पाँटिंग आहे.
मायदेशात सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार –
३० – ग्रॅमी स्मिथ
२९ – रिकी पाँटिंग
२२ – स्टिव्ह वॉ
२२ – विराट कोहली
२१ – एमएस धोनी
विराटची कसोटी कर्णधार म्हणून कारकिर्द
विराटने त्याच्या कारकिर्दीत ५९ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यातील ३५ सामन्यात भारताने विजय मिळवला असून १४ सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच १० सामने अनिर्णित राहिले आहेत. तो भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवणारा खेळाडू आहे.
या संघांविरुद्ध ‘कर्णधार’ विराटने मिळवलेत विजय –
विराटने कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवले आहे. या दोन्ही संघांविरुद्ध त्याने प्रत्येकी ७ सामने जिंकले आहेत. तर श्रीलंका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने प्रत्येकी ६ विजय मिळवले आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध त्याने प्रत्येकी ३ विजय मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पराभवासह इंग्लंडच्या पदरी पडलं ‘हे’ लाजिरवाणं दान, नकोशा यादीत पोहोचले दुसर्या स्थानावर
फक्त ८४२ चेंडूत संपला सामना अन् अहमदाबाद कसोटीची झाली इतिहासात नोंद
अवघ्या ९ वर्षात अश्विनने गाठला ४०० बळींचा टप्पा, ‘या’ खास यादीत गाठले दुसरे स्थान