भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावे करू शकतो. या विक्रमाद्वारे किंग कोहली दिग्गज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार आहे. कोहलीला इतिहास रचण्यासाठी फक्त 58 धावा करायच्या आहेत.
वास्तविक, 58 धावा केल्यानंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण करेल. तो केवळ या आकड्याला स्पर्श करणार नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27 हजार धावा करणारा फलंदाज बनणार आहे. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 623 डावांमध्ये 27 हजार धावा करण्याचा टप्पा गाठला होता तर कोहलीनं आतापर्यंत 591 आंतरराष्ट्रीय डाव खेळले आहेत. अशा परिस्थितीत, सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडण्यासाठी कोहलीकडे पुरेसे डाव आहेत. कोहलीनं आतापर्यंत 26942 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांची यादी पाहिली, तर सध्या विराट कोहली हा एकमेव सक्रिय खेळाडू आहे.
या यादीत सचिन तेंडुलकर 34357 धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा याचा क्रमांक लागतो, ज्यानं 28016 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग येतो, ज्यानं 27483 धावा ठोकल्या. यानंतर किंग कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीनं आतापर्यंत 113 कसोटी सामने खेळले. कसोटीत त्यानं 191 डावांमध्ये 49.15 च्या सरासरीनं 8848 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 29 शतकं आणि 30 अर्धशतके निघाली.
हेही वाचा –
“गौतम गंभीर ट्रकवर चढला, ड्रायव्हरची कॉलर पकडली”; सहकारी खेळाडूनं सांगितला भयानक किस्सा
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी आनंदाची बातमी! दुखापतीनंतर टीम इंडियाचा ‘लॉर्ड’ पुनरागमनासाठी सज्ज
4,4,4,4,4….बाबर आझमनं नवख्या गोलंदाजावर काढला राग; तरीही संघाचा पराभव