आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात सोमवारी (२० सप्टेंबर) चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. तीन वेळेस आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दोन वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने-सामने असणार आहे.
या सामन्याच्या एक दिवसापूर्वीच विराट कोहलीने हा हंगाम संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कर्णधार म्हणून खेळत असलेल्या शेवटच्या हंगामात तो चांगली कामगिरी करून संघाला जेतेपद मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला अनेक मोठ-मोठे विक्रम करण्याची संधी असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणारा सामना हा विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना असणार आहे. हा सामना खेळताच तो आयपीएल स्पर्धेत २०० सामने खेळणारा ५ वा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी असा कारनामा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी, सुरेश रैना, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकाताचा खेळाडू दिनेश कार्तिक याने केला आहे.
टी -२० क्रिकेटमध्ये गाठणार १० हजार धावांचा आकडा
या सामन्यात विराट कोहलीकडे टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. जर त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात ७१ धावा करण्यात यश आले, तर तो हा कारनामा करणारा पाचवा खेळाडू ठरेल.विराट कोहलीपूर्वी हा कारनामा वेस्ट इंडिजचे विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, पाकिस्तानच्या शोएब मलिक आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने देखील केला आहे.
तसेच इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात विराटने मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्याने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत ६ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता. असा कारनामा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रायुडू-चहरच्या दुखापतींविषयी प्रशिक्षक फ्लेमिंग यांचा महत्त्वपूर्ण खुलासा, म्हणाले…
चर्चा आयपीएलच्या प्लेऑफची! ‘हे’ संघ गुणतालिकेत राहतील पहिल्या चार स्थानांवर, गंभीरचा अंदाज