राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं आयपीएल कारकिर्दीतील 8 वं शतक झळकावलं. त्यानं 67 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. तो 72 चेंडूत 113 धावा करून नाबाद राहिला. या दरम्यान त्यानं 13 चौकार आणि 4 षटकार मारले.
‘रन मशीन’ विराट कोहलीची बॅट यंदाच्या मोसमात थांबायचं नाव घेत नाहीये. या सामन्यात त्यानं आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 7,500 धावाही पूर्ण केल्या. आयपीएलच्या इतिहासात असं करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. याशिवाय या सामन्यात इतरही अनेक विक्रम बनले आहेत.
72 चेंडूत 113 धावांची खेळी खेळून विराट कोहलीनं आयपीएलच्या इतिहासातील त्याच्या सर्वोच्च धावसंख्येची बरोबरी केली आहे. किंग कोहलीनं यापूर्वी 2016 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध 113 धावांची इनिंग खेळली होती. आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध 113 धावांची नाबाद खेळी खेळून त्यानं स्वतःच्या सर्वात मोठ्या धावसंख्येची बरोबरी केली आहे. याशिवाय आयपीएल 2024 मधील ही त्याची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या आधी कोहलीची चालू हंगामातील सर्वोच्च धावसंख्या 83 धावा होती, जी त्यानं केकेआरविरुद्धच्या सामन्यात केली होती. तसेच आयपीएलच्या या हंगामात कोणत्याही खेळाडूनं ठोकलेलं हे पहिलं शतक आहे.
आयपीएलच्या इतिहासात डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन या जोडीनं सलामीला सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यांच्या नावे पहिल्या विकेटसाठी 2,220 धावा आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसमध्ये 125 धावांची भागीदारी झाली. यासह कोहली आणि डु प्लेसिस जोडीनं सलामीला सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. या दोघांनी आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी 1,432 धावा केल्या आहेत. या सामन्यात डु प्लेसिसनं 33 चेंडूत 44 धावा केल्या.
पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली आणि डु प्लेसिसची जोडी सध्या चौथ्या स्थानावर आहे. सध्या त्यांच्या पुढे गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाची जोडी आहे, ज्यांनी 1,478 धावा केल्या आहेत. त्यांच्यानंतर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या जोडीचा क्रमांक लागतो. त्यांनी आजपर्यंत पहिल्या विकेटसाठी 1,461 धावा ठोकल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रन मशीन’ कोहली थांबायचं नाव घेईना! आयपीएलमध्ये रचला आणखी एक इतिहास; आसपासही कोणी नाही!
ग्राउंड्समनच्या मुलानं केलं आरसीबीसाठी आयपीएल पदार्पण! जाणून घ्या कोण आहे सौरव चौहान