आयपीएल 2024 चा 19वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यासाठी आरसीबीनं आपल्या संघात एक बदल केला.
गुजरातमधील 23 वर्षीय फलंदाज सौरव चौहाननं बंगळुरूकडून आयपीएल पदार्पण केलं. त्यानं प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुज रावतची जागा घेतली. कर्णधार फाफ डु प्लेसिसनं या युवा खेळाडूवर विश्वास दाखवला आहे. टॉसच्या वेळी डु प्लेसिस म्हणाला, “बरेच लोक त्याला (सौरव चौहान) ओळखत नाहीत. मात्र त्याच्याकडे फलंदाजीचं उत्तम कौशल्य आणि ताकद आहे. तो एक चांगला आणि शांत माणूस आहे.”
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सौरव चौहान अहमदाबादमध्ये ग्राउंड्समन म्हणून काम करणाऱ्या दिलीप चौहान यांचा मुलगा आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात त्याला आरसीबीनं त्याच्या 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केलं होतं.
सौरव चौहान देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातसाठी खेळतो. त्यानं 2021 मध्ये केरळविरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यानं विजय हजारे ट्रॉफीद्वारे लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. फेब्रुवारी 2022 मध्ये सौरवनं गुजरातसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला.
सौरव चौहानची टी 20 कारकीर्द शानदार राहिली आहे. त्यानं 19 सामन्यांमध्ये 29 ची सरासरी आणि 152.13 च्या स्ट्राइक रेटनं 464 धावा ठोकल्या आहेत. त्याच्या नावे टी20 मध्ये 4 अर्धशतकही आहेत. नाबाद 84 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या मागील हंगामात सौरवनं 8 सामन्यांत 35.85 ची सरासरी आणि 184.55 च्या स्ट्राइक रेटनं 251 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्यानं 2 अर्धशतकही झळकावले होते. 61 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर राहिला. प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याच्या नावे 2 शतकं आणि 4 अर्धशतकं आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी एवढा आवाज कधीच ऐकला नव्हता”, धोनीच्या मैदानातील एंट्रीवर पॅट कमिन्सची प्रतिक्रिया
‘थाला’ला पाहण्यासाठी काहीही! हैदराबादमध्ये चाहत्यांनी तोडले स्टेडियमचे बॅरिकेड्स, पोलिसांकडून कारवाई