पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२६ मार्च) होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे होत असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुलने खास विक्रम केला आहे.
विराटने पुण्यात खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने या सामन्यात ११ वी धाव घेताच हा विक्रम केला. पुण्यात खेळताना ७०० आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
आत्तापर्यंत पुण्यात २ मैदानांवर आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. त्यातील एक म्हणजे गहुंजे येथे असणारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आणि दुसरे म्हणजे नेहरु स्टेडियम. या दोन्ही स्टेडिमयवर मिळून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट अव्वल क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. त्याने पुण्यात २७४ धावा केल्या आहेत.
केएल राहुलच्याही २०० धावा पूर्ण
केएल राहुलने देखील पुण्यात खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० धावांचा टप्पा पार केला आहे. तो हा टप्पा पार करणारा केवळ विराट आणि शिखर धवननंतरचा तिसरा क्रिकेटपटू आहे.
पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
७००- विराट कोहली, सामने- १०*
२७४- शिखर धवन, सामने- ८
२०० – केएल राहुल, सामने- ५*
१६१- माईक गॅटिंग, सामने- २
१३६- स्टिवन स्मिथ, सामने- १
१३३- मार्क वॉ, सामने-१
भारताची खराब सुरुवात
दुसऱ्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी बरी झाली नाही. भारताने शिखर धवनची विकेट चौथ्याच षटकात गमावली. तो ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमध्ये २८ धावांची भागीदारी झाली असताना रोहित २५ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि केएल राहुलने भारताचा डाव सांभाळला.
महत्त्वाच्या बातम्या –
अविश्वसनीय!! ट्रेंट बोल्टने डाइव्ह मारत टिपला भन्नाट झेल; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
“विराट कोहलीने धावा करायला नको, कारण…”, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचे भाष्य
दुसऱ्या वनडेत शिखर धवन करु शकतो ‘हा’ मोठा रेकॉर्ड; गांगुली, विलियम्सनलाही टाकू शकतो मागे