भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली शुक्रवारी (18 ऑगस्ट) आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पंधरा वर्षे पूर्ण करत आहे. याच दिवशी त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. अंडर 19 संघाचा विश्वविजेता कर्णधार म्हणून सुरू केलेला प्रवास, वर्तमान क्रिकेटमधील जगातील सर्वात यशस्वी फलंदाज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.
2008 मध्ये अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघाने विजय संपादन केला होता. या संघाचे नेतृत्व करत असलेल्या विराट कोहली यांनी फलंदाजीत देखील आपला दर्जा दाखवून दिलेला. त्यानंतर याच वर्षी झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली. पहिल्या सामन्यात केवळ बारा धावा करून बाद झालेल्या विराट पुढे जाऊन विश्वविक्रमी कामगिरी करेल, याची कल्पना अनेकांना आली नव्हती.
निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी दाखवलेला विश्वास त्याने पुढील काळात सार्थ ठरवताना, संघातील आपली जागा निश्चित केली. 2011 वनडे विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावून सर्वात मोठ्या व्यासपीठावर आपली दखल घेण्यास भाग पाडले. भारताच्या विश्वविजयात त्याचे मोलाचे योगदान राहिले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
2012 आशिया चषक पाकिस्तान विरुद्ध केलेली 183 धावांची अजरामर खेळी, होबार्ट येथे श्रीलंकेविरुद्ध ठोकलेले वादळी शतक त्याचा दर्जा दाखवून देणारे होते. कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळातच ऑस्ट्रेलियात जाऊन शतक ठोकण्याची अद्वितीय कामगिरी त्याने केली. 2024 व 2016 अशा सलग दोन टी20 विश्वचषकात तो स्पर्धेचा मानकरी राहिला.
कर्णधार बनल्यानंतर त्याने भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेले. इंग्लंडमध्ये भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. तर, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करत कसोटी मालिका जिंकणारा पहिला कर्णधार होण्याचा मान त्याला मिळाला. दोन वेळा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करूनही विजेतेपद मिळवण्यापासून विराट व भारतीय संघ वंचित राहिला.
2021 मध्ये कर्णधारपद सोडल्यानंतर ही विराट शानदार कामगिरी करत आहे. त्याच्या नावे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये 111 सामन्यात 8676, 275 वनडेत 12898 व 115 टी20 सामन्यात 4008 धावा जमा असून, या तब्बल 76 शतके समाविष्ट आहेत. सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा व सर्वाधिक शतके याबाबतीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात विराटच्या कामगिरीवर भारतीय संघाचे बरेचसे अवलंबून असेल.
(Virat Kohli Complete His 15 Years In International Cricket)
महत्वाच्या बातम्या-
गंभीर सोडणार सुपरजायंट्सची साथ? ‘या’ संघाकडून आली ऑफर
मिनी ऑरेंज आयटीएफ मिश्र रिले राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक